आयुक्त गायकवाड यांची माहिती
पुणे – कायमस्वरूपी भरतीही करणार असल्याने अंदाजित स्वरूपात कागदपत्रे घेऊन भरती करता येणार नाही. त्यासाठी मेरिट लिस्ट आणि ठराविक पदांची यादी (शुक्रवार, दि. 29) प्रसिद्ध करणार आहोत. मात्र, मुख्यसभा होणार नसल्याने तात्पुरत्या स्वरूपातच पदे भरणार असल्याचे पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.
कायमस्वरूप 178 पदे आणि तात्पुरत्या स्वरूपात 1105 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामध्ये एमबीबीएस डॉक्टर, आयुर्वेदिक डॉक्टर, आरोग्य निरीक्षक, हिवतापासाठी निरीक्षक, ज्युनियर आणि सिनीयर नर्स अशा पदांचा समावेश आहे. मात्र, सद्यस्थितीत तात्पुरत्या स्वरूपात तीन महिन्यांसाठी भरती करण्यात येणार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केल्याने, अर्ज येण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
डॉक्टर भरतीचे सर्व अधिकार मुख्यसभेला आहेत. पुढील सुमारे अडीच महिने मुख्यसभा होणार नाही. त्यामुळे कायमस्वरूपी डॉक्टरभरतीच्या प्रस्तावावर आता तरी निर्णय होणार नाही. सद्यस्थितीत 1070 पेक्षा जास्त अर्ज आले आहेत. त्यातील काही जणांचे कागदपत्रे लॉकडाऊनमुळे पोहोचू शकले नाहीत.
यातील काही जागांची भरती कायमस्वरूपी असल्याने कागदपत्रांची पूर्णत: होणे आवश्यकच आहे. आधी मेरिट लिस्ट देऊन काही ठराविक पदांची यादी प्रसिद्ध करणार आहे. तातडीने लागणारी पदे कोणती आहे त्याची प्रारूप यादीही शुक्रवारी प्रसिद्ध होईल. यावर पुढील दोन दिवसांत हरकती मागवण्यात येतील. उमेदवारांना आपले नाव अथवा गुणांची खातरजमा वेबसाइटवर करता येईल. त्यानंतर अंतीम यादी करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले.