नेत्यांचेही दुर्लक्ष; महिना उलटूनही साताऱ्यात ठरेना सभेची तारीख
सातारा – तब्बल महिना उलटला तरी सातारा पालिकेच्या सर्वसाधारण सभेची तारीख ठरेनाशी झाली आहे. सभेच्या विषयांवर सत्ताधाऱ्यांचे मतभेद वाढल्याने स्थायी समितीसह सर्वसाधारण सभा अडकून पडली आहे.
राज्यातील महाशिव आघाडीचा प्रयोग सातारा जिल्हयाच्या राजकारणाला भलताच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे माजी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले राजकीयदृष्टया विशेष सक्रिय नसून सर्व राजकीय घडामोडींपासून स्वतःला अलिप्त ठेवले आहे. भाजपच्या मंडल व अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनीच वरचष्मा ठेवून राजे गट व समर्थक यांना बाजूला ठेवले आहे. उदयनराजे सध्या साताऱ्यात असले तरी त्यांच्यासमोर कोणताच राजकीय अजेंडा नाही. त्यामुळे पालिकेच्या कारभारात काय उलथापालथ सुरु आहे, याकडेसुध्दा त्यांचे लक्ष नाही. सातारा विकास आघाडीचे ऍड. दत्ता बनकर साताऱ्यात नाहीत.
पक्ष प्रतोद निशांत पाटील सर्वसाधारण सभेशिवाय पालिकेकडे फिरकत नाही. सभागृह नेते स्मिता घोडके यांचेसुध्दा म्हणावे तसे लक्ष नाही.
नगराध्यक्षा माधवी कदम यांच्याकडे चौकशी केली असता दोन दिवसात अजेंडा निघेल, असे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात पंधरा दिवसांपासून त्या हीच माहिती देत आहेत. अजेंड्याचे विषय ज्याला जमेल तसे आणून देत असल्याने विषयांची यादी मारूतीच्या शेपटागत वाढत चालली आहे. संकेताप्रमाणे पार्टी मिटिंगचे विषय, चर्चेचे मुद्दे आणि नगर विकास आघाडी तसेच भाजपला निमंत्रण पाठवून विषय अंतिम करणे ही काहीच प्रक्रिया झालेली नाही. बऱ्याच विषयांवर सातारा विकास आघाडीच्या गोटातच अंतःस्थ मतभेद असल्याने सर्वसाधारण सभेचा मुहूर्त ठरण्यास अडचणी येत आहेत.