महापालिकेचे “वराती मागून घोडे’

शहरातील पूरग्रस्तांची आठवण : महिन्यानंतर चादरी, बेडशीट देणार

पिंपरी  – संततधार पावसामुळे धरणातून विसर्ग वाढविल्याने पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या मुळा आणि पवना नदीला 4 व 5 ऑगस्ट रोजी पूर आला होता. त्याचा शेकडो कुटुंबांना फटका बसला. आता तब्बल महिना उलटून गेल्यानंतर पूरबाधित झोपड्यांमधील नागरिकांना चादर, ब्लॅंकेट, बेडशीट दिले जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव उद्या (दि. 4) होणाऱ्या स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. प्रस्ताव मंजुरी त्यानंतर खरेदी यासाठी आणखी काही कालावधी जाणार आहे. “वराती मागून घोडे’ दामटण्याच्या महापालिकेच्या कारभाराबाबत करदात्यांमधून नाराजी व्यक्‍त होत आहे.

मुळा आणि पवना नदीला पूर आल्याने नदीकाठच्या सुमारे सात हजार लोकांचे स्थलांतर करावे लागले होते. 4 व 5 ऑगस्ट असे दोन दिवस शहरात पूरपरिस्थिती होती. झोपडपट्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे दैनंदिन जीवनमान पूर्ववत होण्यासाठी महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत पूरबाधित तसेच शहरातील घोषित, अघोषित झोपडपट्टीत वास्तव्यास असलेल्या सर्व महिलांना दररोज वापरण्यासाठी साहित्य देण्यात येणार आहे. त्यामध्ये दोन चादर, दोन बॅरेक कंबल, दोन दरी पंजा आणि दोन बेडशीट असा संच दिला जाणार आहे. त्यासाठी त्यांच्या कुटुबियांच्या नावे असलेला फोटा पास अथवा स्वत:चे आधार कार्ड यापैकी कोणताही एक पुरावा द्यावा लागणार आहे. महाराष्ट्र राज्य हातमाग सहकारी महासंघ मर्यादित, दि पतंगनगर गार्डन व्हयू को-ऑप हौसिंग सोसायटी लि शंशाक घाटकोपर मुंबई यांच्याकडून सरकारच्या दर करारानुसार साहित्य खरेदी केले जाणार आहे.

याचा सर्व खर्च नागरवस्ती व विकास योजना विभागाकडे 2019-20 या अंदाजपत्रकातील इतर कल्याणकारी योजनेच्या उपलेखाशीर्षावरील तरतुदीमधून केला जाणार आहे. त्याचबरोबर लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ झाल्यास 31 मार्च 2020 अखेर पर्यंत योजना राबविण्यासाठी विभागातील व इतर विभागातील लेखाशीर्षावरील अखर्चित, शिल्लक तरतुदीमधून नागरवस्ती विकास योजनेतून केला जाणार आहे. याबाबत येणाऱ्या प्रत्यक्ष खर्चास मान्यता देण्यासाठी प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला आहे. पूर ओसरुन महिना होत आला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात खरेदी व हे साहित्य बाधितांपर्यंत पोहचविण्यास आणखी किमान महिनाभराचा वेळ जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)