ठेकेदाराला आधीच दिले बिल; आता दोन वर्षांनंतर लावलेत दिवे
पुणे – महापालिकेकडून शहरात अनावश्यक कामांसाठी होणारी उधळपट्टी पुणेकरांना नवीन नाही. मात्र, महापालिकेच्या विद्युत विभागाकडून शहरात बसविण्यात येणाऱ्या शोभिवंत पथदिव्यांचे तब्बल दहा लाखांचे बिल दोन वर्षांपूर्वीच अदा केले. मात्र, ज्या कामासाठी ही रक्कम दिली ते पथदिवे बसवलेच नसल्याचे समोर आल्यानंतर शहरात रातोरात चार ठिकाणी तब्बल अडीच लाख किमतीचे शोभेचे दिवे बसविल्याचे समोर आले आहे. त्यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणून एक दिवा चक्क ज्या ठिकाणी उड्डाणपूल पाडून नवीन उड्डाणपूल उभारला जाणार आहे त्या पुणे विद्यापीठ चौकात बसविण्यात आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या पैशाच्या उधळपट्टीचा हा आंधळा कारभार कधी थांबणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महापालिकेच्या विद्युत विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पालिकेने शहरात शोभिवंत हायमास्ट दिवे लावण्यासाठी दोन वर्षांपूर्वी निविदा काढली होती. त्यानंतर या कामाचे पैसेही संबधित ठेकेदाराला देण्यात आले. मात्र, त्यांच्याकडून अद्याप हे दिवेच बसविण्यात आले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ही बाब समोर आल्यानंतर विद्युत विभागाकडून तातडीने हे हायमस्टचे शोभिवंत दिवे शहरात चार ठिकाणी बसविण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार, पुणे विद्यापीठ चौकासह शहरात टिळक चौक, विद्यापीठ चौक तसेच शनिवारवाड्यासह आणखी एका ठिकाणी हे दिवे बसविण्यात आले असून त्यांची किंमत तब्बल अडीच लाख रुपयांना एक याप्रमाणे आहे. त्यामुळे दोन वर्षानंतर काम पूर्ण झाले तर कामाचे बील पालिकेनेच कोणत्या आधारावर दिले, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
ही सर्वच बाब गंभीर आहे. त्यापेक्षाही गंभीर बाब म्हणजे ज्या ठिकाणी हा उड्डाणपूल पाडला जात आहे. त्या ठिकाणी दिवा बसविण्यात आला असून करोनासारख्या गंभीर संकटाच्या काळात हे शोभिवंत दिवे बसविण्याचा घाट कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यामुळे या सर्व प्रकारची तातडीने चौकशी व्हावी.
– विवेक वेलणकर, सजग नागरिक मंच, पुणे