पुणे –शहरातील बालमजुरी रोखण्यासाठी महापालिका कटिबद्ध असून वंचित घटकांतील सर्व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी बुधवारी सांगितले. जागतिक बालमजुरी विरोध दिनानिमित्त महापालिका आणि बालहक्क कृती समितीच्या वतीने बाल मजुरी विरोधात “बाल जनमत’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी डॉ. धेंडे यांनी मनपा शाळेतील मुलांशी संवाद साधला. यावेळी माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी दीपक माळी, कामगार अधिकारी नितीन केंजळे, सहायक प्रशासकीय अधिकारी शरद यादव, माणिक देवकर, सचिन काळे, मनोरमा आवारे, शंकर मांडवे, सुभाष सातव, माणिक देवकर, बाल हक्क कृती समितीचे निमंत्रक मनीष श्रॉफ आणि बालहक्क कृती समितीमधील सर्व संस्था तसेच पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बालमजुरांच्या प्रश्नांची दखल घेत डॉ. धेंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यांचा पाठपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या.