पुणे : महापालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील महिला बचतगटांची नोंदणी महापालिकेच्या समाज विकास विभागाकडे केली जाणार आहे. त्यामुळे, या बचतगटांना महापालिकेच्या वेगवेगळया योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही गावे महापालिकेत येण्यापूर्वी या गटांची नोंदणी संबधित गावांच्या पंचायत समितीकडे होती.
मात्र, गावे पालिकेत आल्यानंतर पंचायत समितीने या पुढे महापालिकेकडे नोंदणी करण्याच्या सूचना बचतगटांना केल्या होत्या. मात्र, नेमकी कोणत्या गटांची नोंदणी करायची तसेच त्याची प्रक्रीया काय असेल हे निश्चित न झाल्याने ही नोंदणी रखडलेली होती. मात्र, आता नोंदणी बाबतचा निर्णय झाल्याने या गावांमधील शेकडे महिलांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
महापालिका हददीत ही गावे चार महिन्यांपूर्वी घेण्यात आली आहे. त्यावेळी ग्रामपंचायतीकडील सर्व रेकॉर्ड महापालिकेने ताब्यात घेतले होते. मात्र, बचतगटांची कोणतीही माहिती अथवा कागदपत्रे ताब्यात घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे, या बचतगटांनी नेमके काय करायचे याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. तर, या बचतगटांच्या प्रतिनिधींकडून गावांसाठी नेमण्यात आलेल्या संपर्क अधिकाऱ्यांकडेही चौकशी करण्यात येत होती.
मात्र, त्यांना काहीच कल्पना नसल्याने ते या प्रतिनिधींना समाज विकास विभागाकडे पाठवित होते. ही बाब लक्षात आल्यानंतर शुक्रवारी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी तातडीनं समाज विकास विभागाची बैठक घेत या गटांच्या नोंदणीबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार, संबधित गाव जोडण्यात आलेल्या क्षेत्रीय कार्यालयातील समाज विकास विभाग ( नागरवस्ती विभाग) ही नोंदणी करता येणार आहे. मात्र, त्यासाठी बचतगटाचे बॅंक खाते राष्ट्रीयकृत बॅंकेत असण्याची अट असून ती पूर्ण करणाऱ्या गटांचीच नोंदणी केली जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांनी सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही महापालिकेकडे याबाबत विचारणा करत होतो. मात्र, नोंदणीचा निर्णय न झाल्याने बचतगटांना महापालिकेचे लाभ मिळणार की नाही याबाबत शंका होती. मात्र, नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याने आमच्या बचतगटांना याचा फायदा होणार आहे. आमच्या सूस गावातच सुमारे 30 ते 35 बचतगट आहेत.
– करूणा चांदेरे ( अध्यक्ष, दिपस्तंभ महिला बचतगट, सूस)