अंदाजपत्रकात 35 लाखांची तरतूद
पुणे – महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे शालांत व उच्च माध्यमिक परीक्षांचे शुल्क या पुढे महापालिका भरणार आहे. दरवर्षी पालिकेच्या शाळांमधून सुमारे 3 हजार विद्यार्थी दहावी, बारावीची परीक्षा देतात. या मुलांना या योजनेचा लाभ होणार आहे. महापालिका आयुक्तांच्या अंदाजपत्रकात या योजनेसाठी सुमारे 35 लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे यापुढे पुणे महापालिका मुलांना 100 टक्के मोफत शिक्षण देणारी संस्था ठरणार आहे.
या योजनेसाठी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी पुढाकार घेत अंदाजपत्रकात ती प्रस्तावित केली होती. आयुक्तांनी त्यानुसार, ही विशेष तरतूद उपस्थित करून दिली आहे. महापालिकेकडून पालिकेच्या शाळांमधील प्राथमिक, माध्यमिक तसेच उच्च माध्यमिकच्या मुलांना शालेय पुस्तके, गणवेश तसेच इतर शालेय साहित्य दिले जाते. मात्र, दहावी आणि बारावीच्या मुलांना बोर्डाचे परीक्षा शुल्क दिले जात नव्हते. हे शुल्क पालकांनाच द्यावे लागत असे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून याबाबत स्थायी समितीत माहिती देण्यात आली होती.
स्थायी समितीत झालेल्या चर्चेत अध्यक्ष रासने यांनी त्यास होकार दिल्यानंतर अतिरिक्त आयुक्तांनीही अंदाजपत्रकात ही बाब सूचवली होती. त्यानुसार, आयुक्तांनी यावर्षी 35 लाखांचा स्वतंत्र निधी दिला आहे. त्यामुळे 2020-21 या परीक्षांचे शुल्क आता पालिका प्रशासन भरणार आहे.
माध्यमिक विभागाला आता उत्तरपत्रिकाही देणार
पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी वर्षभरात चाचणी परीक्षा, सत्र परीक्षा, वर्षिक परीक्षा घेतल्या जातात. त्यासाठी महापालिकेकडून केवळ सातवीपर्यंतच्या मुलांना शाळेकडून उत्तर पत्रिका दिल्या जात होत्या. तर सातवीच्या पुढच्या मुलांना त्या स्वत: विकत आणाव्या लागत होत्या. तर दहावी, बारावीच्या मुलांनाही शालेय परीक्षांसाठी स्वत:च उत्तर पत्रिका आणाव्या लागत होत्या. ही बाब लक्षात घेऊन यावर्षीपासून सातवीच्या पुढील विद्यार्थ्यांनाही उत्तर पत्रिका देण्यात येणार आहे.