नासाडी होण्याऐवजी विकण्यास मान्यता : महसुली उत्पन्नात वाढीचा दावा
प्रतिलिटर 2500 रुपये दराने होणार विक्री
पिंपरी – रक्तपेढीमध्ये अनेक वेळा रक्तदात्यांकडून मोठ्या प्रमाणात रक्तजमा केल्यामुळे अतिरिक्त “रक्तजला’ची मुदत संपल्यानंतर ते वापराविना निरुपयोगी होते. त्यामुळे अनेकदा असे रक्तफेकून दिले जाते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तपेढीमध्येही सण, उत्सव या काळात मोठ्या प्रमाणात रक्त जमा होते. आता रक्तपेढीमध्ये जमा झालेले हे अतिरिक्त रक्तजल फेकून न देता मुंबईस्थित “रिलायंन्स लाईफ सायन्स’ या खासगी कंपनीला विकण्यात येणार आहे. याबाबत बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत आयत्या वेळस आलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे, आता पुढील काळात रक्तदात्यांकडून जमा केलेल्या रक्ताची नासाडी होण्याऐवजी ते रक्तजल विकून पालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे संत तुकारामनगर येथे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) आहे. या रुग्णालयातील रक्तपेढी 24 तास कार्यरत असते. या रक्तपेढीद्वारे विविध शिबिरे आयोजित करून, तसेच रक्तदात्यांना प्रोत्साहित करून रक्त संकलित केले जाते. त्यानंतर महापालिकेच्या सर्व रुग्णालयांसाठी व परिसरातील अन्य रुग्णालयांना रक्तव त्यातील घटकांचा मागणीनुसार पुरवठा करण्यात येत आहे.
रुग्णांच्या गरजेनुसार लाल रक्तपेशी व रक्तबिंबिका हे रक्तघटक वेगळे करून विशिष्ट नियंत्रित तापमानातील शीतगृहात साठवणूक केली जाते. हे रक्तघटक वेगळे करताना व बऱ्याचवेळी लाल रक्तपेशी साठा उपलब्ध नसल्यामुळे रक्तदात्याने दान केलेल्या पूर्ण रक्तातून लाल रक्तपेशी वेगळ्या करून मागणीनुसार रुग्णांना उपलब्ध करून द्याव्या लागतात. परिणामी, मोठ्या प्रमाणात अतिरिक्त रक्तजलाची निर्मिती होते. हे निर्माण झालेले रक्तजल त्वरीत उणे 30 अंश सेल्सियस ते उणे 80 अंश सेल्सियस या विशिष्ट तापमान नियंत्रित करणाऱ्या शीतगृहात गोठलेल्या स्थितीत एक वर्षापर्यंत साठवणूक करता येते. गोठविलेल्या रक्तजलापासून मुदतबाह्य दिनांका अगोदर स्वयंचलित यंत्राद्वारे विघटन करून त्यापासून विविध प्रकारची लस निर्मिती, रक्त गोठविणारे रक्त घटक निर्मिती, इम्युनोग्लोबुलिन इंजेक्शन, विविध मात्रांची अल्बुमिन इंजेक्शन तयार होतात.
तीन कंपन्यांनी दर्शविली तयारी
अतिरिक्त रक्तजल मान्यताप्राप्त कंपनीला दिल्यास महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे म्हणणे आहे. म्हणून हे रक्तजल विकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यासाठी रक्तजल संकलन करणाऱ्या मान्यताप्राप्त कंपन्यांकडून दरपत्रक मागविण्यात आले होते. त्यावर रिलायन्स लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड, इंटास आणि नॅशनल प्लाझा फ्रॅंक्शन सेंटर या तीन कंपन्यांनी दरपत्रक सादर केले. त्यातही “रिलायंस’ने हे अतिरिक्त रक्तजल प्रतिलिटर 2500 रुपये याप्रमाणे घेणार असल्याबाबत कळविले.
रिलांयस कंपनीला रक्तजल संकलित करण्यास केंद्रीय अन्न व औषध परवाना विभागाच्या महासंचालकांनी परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे राज्याच्या अन्न व औषध परवाना विभागाच्या सहआयुक्तांनीही ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालयातील रक्तपेढीतील अतिरिक्त रक्तजल प्रतिलिटर 2500 रुपये प्रमाणे रिलायन्स लाईफ सायन्सेस कंपनीला देण्यात येणार आहे.