पुणे : स्पर्धा परीक्षा उमेदवारांसाठी नाममात्र दरात जागा उपलब्ध करुन देण्यासाठी लवकरच जागा निश्चित केल्या जाणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त डाॅ. राजेंद्र भोसले यांनी दिली. त्या अंतर्गत सातशे ते हजार विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचेही आयुक्तांनी सांगितले.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी राज्यभरातून हजारो उमेदवार पुण्यात येतात. मात्र, त्यांना अभ्यासासाठी पुरेशी जागा नसते. आर्थिक ओढाताण करत या मुलांना अभ्यासासाठी खासगी अभ्यासिकांचा आधार घ्यावा लागतो. गेल्या काही वर्षांत शहरात स्पर्धा परीक्षा उमेदवारांची संख्या लक्षणीय वाढली आहे. प्रामुख्याने सदाशिव पेठ, नवी पेठ, नारायण पेठ, शिवाजीनगर, शास्त्री रस्ता या भागांत या विद्यार्थांसाठी मार्गदर्शन वर्ग भरवले जातात. त्यानंतर संपूर्ण दिवसभर विद्यार्थी वेगवेगळ्या अभ्यासिकांमध्ये असतात. मात्र, अनेक अभ्यासिका कोणत्याही सुरक्षा उपाययोजना न करताच उभारण्यात आलेल्या आहेत.
काही दिवसांपूर्वी एका अभ्यासिकेला आग लागल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. ही बाब लक्षात घेऊन अभ्यासिकांमध्ये सुरक्षा उपाय योजनांच्या अंमलबजावणीसह स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थांना सुरक्षित आणि शांततेमध्ये अभ्यास करता यावा, यासाठी महापालिकेच्या काही शाळांची जागा उपलब्ध करुन देण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. यासाठी काही शाळादेखील निश्चित केल्याचे आयुक्त भोसले यांनी सांगितले.