पिंपरी – मागील वर्षी 1 एप्रिल ते 20 सप्टेंबर 2018 या कालावधीत 457 कोटी 8 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यावर्षी 740 कोटी 44 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या पहिल्या सहामाहीत 283 कोटी 36 लाख रुपयांचे जास्त उत्पन्न मिळाले असून ही वाढ 61.99 टक्के आहे. यामध्ये बांधकाम परवाना विभागाचा सर्वाधिक वाटा आहे.
याबाबतची माहिती स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांनी दिली. ते म्हणाले, सन 2019-20 च्या अंदाजपत्रकात या विभागाला 350 कोटी जमेचे उद्दीष्ट दिले होते. आज अखेर 346 कोटी 9 लाख रुपये इतके उत्पन्न मिळाल्याने बांधकाम परवानगी विभागाकडून 30 सप्टेंबर 19 अखेर 6 महिन्यांच्या आतच दिलेले उद्दिष्ट पूर्ण होण्याची शक्यता आहे.
स्थानिक संस्था कर (एलबीटी) च्या उत्पन्न वाढीसाठी महापालिकेकडून करनिर्धारण करण्यात येणार आहे. त्यासाठी सनदी लेखापालांची नियुक्ती करण्यात येणार आहे. महापालिकेने खासगी सनदी लेखापालांकडून याबाबत प्रस्ताव मागविले होते. त्यानुसार 18 सनदी लेखापालांचे स्वारस्य प्रस्ताव महापालिकेला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 8 सनदी लेखापाल यांचे प्रस्ताव पात्र ठरले आहेत. त्यांच्याकडून प्रलंबित करनिर्धारण प्रकरणाची करनिर्धारण करुन घेण्यास स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. या प्रलंबित करनिर्धारण प्रकरणातून पुढील 3 महिन्यांत अंदाजे शंभर कोटी रुपये इतके उत्पन्न मिळण्याची शक्यता मडिगेरी यांनी वर्तविली.