पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये साडेपाच लाख मिळकतधारक आहेत. या मिळकतींच्या करापोटी महापालिकेच्या तिजोरीमध्ये वर्षाला नऊशे ते एक हजार कोटी रुपयांची रक्कम जमा होते. यावर्षी कर वसुलीसाठी महापालिकेनी तीव्र मोहिम हाती घेतली आहे. थकबाकीदारांना नोटीस दिल्या असून जप्तीच्या कारवाईला सुरूवात केली आहे.
शहरातील एक लाखांपुढील थकबाकी असलेल्या 23 हजार 304 मालमत्ताधारकांना नोटीस देण्यात आली आहे. तर आजपासून करसंकलन विभागाच्या वतीने जप्तीच्या कारवाईला सुरूवात केली आहे. पिंपळे गुरव येथील जवळकरनगर मधील मॉलवर जप्तीची कारवाई केली आहे. तर भोसरी येथील हॉटेल साईनाथ सील करण्यात आले आहे.
कर वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी एक मार्चपासून 16 झोनमध्ये एकूण शंभऱ मालमत्ता जप्त करण्याचे नियोजन विभागाने केले आहे. यामध्ये मोठ्या औद्योगिक मिळकतींचा समावेश आहे. वारंवार त्यांना नोटीस देऊनही कर भरत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
अनेक मिळकतधारक कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर धनादेश देतात. मात्र तो धनादेश बॅंकेत वटत नाही. त्यामुळे पुन्हा त्यांच्याकडे कारवाईसाठी जावे लागते यामध्ये वेळ जातो. तसेच महापालिकेची फसवणूक देखील होते. त्यामुळे यापुढे धनादेश वटला नाही तर त्या संबंधित मिळकत धारकावर फौजदारी कारवाई करण्यात येईल. त्यासाठी करसंकलन विभाग कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही.
– नीलेश देशमुख, सहायक आयुक्त, करसंकलन विभाग.
एका दिवसांत 7 कोटी 19 लाख वसूल
आव्हान पूर्ण करण्यासाठी विभागाच्या वतीने कारवाई मोहिम तीव्र करण्यात आली आहे. नोटीस दिलेल्या अनेकांकडून थकबाकीची रक्कम वसूल होत आहे. सोमवारी (दि. 28) एकाच दिवशी करसंकलन विभागाला 7 कोटी 19 लाख रुपये करापोटी मिळाले आहेत. त्यामध्ये डॉयनॅमिक लॉजिस्टिक यांच्याकडून 2 कोटी 97 लाख व रिलायन्स टॉवरकडून 5 कोटी रुपये मिळाले आहेत.
फेब्रुवारीअखेर 400 कोटींची वसुली
महापालिकेच्या करसंकलन विभागाने 1 एप्रिल 2021 ते फेब्रुवारी अखेरपर्यंत 406 कोटी 72 लाख रुपये वसूल केले आहेत. मार्च महिन्याअखेर विभागाला आणखी 544 कोटी रुपये वसूल करावे लागणार आहेत. एका महिन्यात एवढी मोठी रक्कम वसूल करताना विभागाची दमछाक होणार आहे. तर यामुळे महापालिकेच्या अर्थिक बाबींवर ताण येण्याची शक्यता आहे.