ऑन कॉल सुविधा : क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे दिली जबाबदारी
पिंपरी – स्वच्छ आणि सुंदर पिंपरी-चिंचवड शहर करण्यासाठी आता महालिकेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहेत. शहरातील विविध भागात निर्माण होणारा कचरा तातडीने उचलण्यासाठी महापालिकेने “ऑन कॉल’ सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे, आपल्या परिसरात साचलेल्या कचऱ्याची माहिती नागरिकांनी कॉल करुन दिल्यानंतर अवघ्या काही तासांत हा कचरा महापालिकेकडून उचलला जाणार आहे. महापालिकेने सुरु केलेल्या या सुविधेमुळे अनेक परिसरात निर्माण झालेली कचऱ्याची समस्या सुटण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
शहरातील अनेक भागात मागील काही महिन्यांपासून कचऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. महापालिकेकडून वेळेवर कचरा उललला जात नसल्याने अनेक ठिकाणी कचरा कुंडी ओव्हर फ्लो झाल्या आहेत. काही ठिकाणी कचऱ्याचे ढिग साचले होते.यापार्श्वभूमिवर कचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे.
जुलै महिन्यापासून महापालिकेने कचरा संकलन व वाहतुकीच्या कामासाठी दोन कंपन्यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये, ए.जी इन्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रा. लिमिटेड या संस्थेला शहराच्या दक्षिण भागाची जबाबदारी दिली आहे. तर उत्तर भागासाठी बीव्हीजी इंडिया या संस्थेला नियुक्त करण्यात आले आहे. या दोन्ही कंपन्या शहरातील कचरा संकलन करत आहेत. कोणत्याही भागातील कचरा साचून राहू नये, याची काळजी घेण्यासाठी यावेळी कचरा संकलन करणाऱ्या कंपनीसोबत महापालिकेच्या आरोग्य विभागातील सहाय्यक क्षेत्रीय अधिकाऱ्यांनाही जबाबदारी देण्यात आली आहे.
त्यानुसार महापालिकेने ऑन कॉल ही सुविध नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे. या सुविधेनुसार सर्व आठही क्षेत्रामध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यांना फोन करुन आपल्या भागातील कचऱ्याची माहिती नागरिकांनी दिल्यानंतर या अधिकाऱ्यांनी तातडीने संबधित ठिकाणी वाहने पाठवून कचरा उचलला जाणार आहे.