पिंपरी – शहरातील बीआरटी थांबे, रस्ते, मोकळी मैदाने आणि वाईन शॉप समोरील जागा या ओपन बार बनल्या आहेत. याठिकाणी बाटल्यांचा खच पडला असून शहराच्या अन्य भागातही रात्री उशिरापर्यंत ओल्या पार्ट्या रंगू लागल्या आहेत. बीआरटी रस्त्यावरही दारूच्या रिकाम्या बाटल्या फोडण्याच्या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. या परिसरात मॉर्निंग अथवा सायंकाळी चालण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना फुटलेल्या काचांचा त्रास सहनकरावा लागत आहे.
काळेवाडी ते मोहननगर या बीआरटी मार्गाच्या दुर्तफा नागरीवस्ती असून बीआरटी मार्गावर रात्रीच्यावेळी एखाद-दुसऱ्या वाहनांच्या वर्दळीशिवाय येथे फारसे नजरेस पडत नाही. या रस्त्यावर नागरिकांचा वावर कमी असल्याने रात्री आठ वाजल्यानंतर ओपन बार जोरात सुरू होतात. काळेवाडीतील आदर्शनगर बीआरटी बस स्टॉप या ठिकाणी मद्य पिऊन रस्त्यावर बाटल्या फोडण्याचे ही प्रकार घडतात. पहाटे चार वाजल्यापासून या मार्गावर परिसरातील नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येतात. रात्रीच्यावेळी फोडलेल्या बाटलीच्या काचा दिसून येत नाही. त्यामुळे या परिसरात फिरण्यास येणाऱ्या नागरिक जखमी होण्याचे प्रकार घडले आहेत.
एकीकडे याठिकाणी शहराच्या सौंदर्यात भर घालणार सुंदर प्रकल्प उभे राहत असून दुसरीकडे ओपन बारचे ओंगळवाणे दृश्य पाहवयास मिळत असल्याने शहराच्या सौदर्यांकरणात बाधा होत आहे. सर्वोच्य न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य आणि राष्ट्रीय महामार्गालगतचे पाचशे मीटर अतंरापर्यंतचे बार बंद झाले आहेत. मात्र शहरात हे नियम लागू नाहीत. त्यामुळे पिंपरी चौकातील दारूच्या दुकानाच्या बाहेर हातगाड्यांवरील चकना खात तळीराम सर्रास दारूचे घोट रिचवित असल्याचे आढळून येतात.
याचठिकाणी पिंपरीगाव व काळेवाडी परिसरात जाण्यासाठी शेअर रिक्षास्टॅण्ड व पीएमपीएमएलचा बस थांबाही आहे. दारूची नशा चढल्यानंतर हे तळीराम ते एकमेकांना शिवीगाळ व मारहाणही करतात. यामुळे प्रवासी महिलांमध्ये भतिीचे वातावरण निर्माण होते. आदर्शनगर, काळेवाडी येथे पोलीस फिरकण्याची शक्यता नसल्याने येथील बीआरटी बस थांब्यावरच मैफल रंगते. रात्रीचा रंग भरू लागला की पुन्हा पार्सल आणून मध्यरात्रीपर्यंत रस्त्यावर हुल्लडबाजी सुरू असते. ठिकठिकाणच्या या फोफावणाऱ्या ओपन बारमुळे शहरवासियांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत आहे.
पोलीस चौकीसमोरच तळीरामांचा अड्डा
पिंपरी चिंचवड लिंक रोड येथे नुकतीच चिंचवड पोलिसांची चौकी सुरू झाली आहे. या चौकीच्या समोर संत मदर तेरेसा पुलावरील बीआरटी बसस्टॉपकडे जाणारा मार्ग आहे. या मार्गावर रात्रीच्यावेळी तळीराम आणि गर्दुल्ल्यांचा अड्डा असतो. यामुळे नशेखोरांना पोलिसांचेही भय राहिले नाही, अशी भावना जनसामान्यांमध्ये आहे.