बांधकाम परवानगीतून पहिल्या सहामाहीतच महापालिकेला 333 कोटींचे उत्पन्न 

गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट उत्पन्न : वर्षभरात 510 कोटी रुपयांचे उद्दिष्ट 

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेला 2019-20 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत बांधकाम परवानगीतून तब्बल 333 कोटी रुपयांचे भरीव उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीपेक्षा यंदा दुप्पट उत्पन्न मिळाले आहे. बांधकाम विभागाला वर्षभरात 510 कोटी रुपये उत्पन्नाचे उदिष्ट देण्यात आले आहे. याबाबतची माहिती कार्यकारी अभियंता तथा स्थापत्य विभागाचे प्रवक्ते शिरीष पोरेड्डी यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या काही वर्षांत नवीन बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. शहरातील विविध भागांमध्ये नवनवे गृहप्रकल्प सुरू झाले आहेत. हक्काचे घर आणि गुंतवणूक, अशा दोन उद्देशाने घरे खरेदी केली जात आहेत. पुनावळे, ताथवडे, वाकड भागात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प झाले आहेत. त्याचबरोबर मोशी, चऱ्होली परिसरात देखील गृहयोजना झाल्या आहेत. तसेच शहराच्या संपूर्ण भागात गृहप्रकल्प वाढले आहेत. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या उत्पन्नात भर पडत आहे.

गतवर्षी पहिल्या सहा महिन्यांमध्ये बांधकाम परवाना विभागाकडून पालिकेला 156 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. यंदा त्यामध्ये दुपटीने वाढ झाली आहे. पहिल्या सहा महिन्यात आजअखेर तब्बल 333 कोटी रुपयांचे उत्पन्न महापालिकेला मिळाले आहे. कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी म्हणाले, बांधकाम परवानगी देण्याची महापालिकेची प्रक्रिया किचकट नाही. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. त्यामुळे मानवी हस्तक्षेप नाही.

“पीसीएनटीडीए’, “पीएमआरडीए’ आणि “एमआयडीसी’ या तीन संस्थापेक्षा महापालिकेची प्रक्रिया अतिशय सुलभ आहे. शहराच्या सर्वच भागात गृहप्रकल्पांची संख्या वाढत आहे. त्यामुळे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या उत्पन्नात भर पडली आहे. मंदी असली तरी बांधकाम व्यावसायिकांकडून “प्लॅन’ मंजूर करुन घेतले जात आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)