पुणे – स्थायी समितीने मिळकतकर थकबाकीदारांसाठी अभय योजनेचा प्रस्ताव मंजूर केला. त्यानंतर प्रशासनाने तातडीने ड्युटीसाठी तैनात केलेल्या कर आकारणी आणि कर संकलन विभागातील उपाधिक्षक व टंकलेखक पदावरील काहीजणांना करोनाच्या कामातून मुक्त केले. करोना प्रादुर्भाव वाढीस लागल्यानंतर महापालिकेच्या सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांना गेल्या काही महिन्यांपासून केवळ करोना ड्युटीवरच नियुक्त केले होते.
दरम्यान, करोना काळात महापालिकेचे उत्पन्न घटले असून उपाययोजनांसाठी आतापर्यंत लाखो रुपये खर्च केला. यापुढेही खर्च करावाच लागणार असून यासाठी अभय योजनेच्या माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रशासनानेही तातडीने प्रतिसाद देत करोना कामगिरीवर असलेल्या लिपिकांना या ड्युटीतून कार्यमुक्त करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला असून तसा आदेश अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिला.