रवींद्र कदम
स्वयंभूला कचरा संकलनासाठी मनपा वाहने खरेदी करून देणार
आरटीओ दराबाबत मनपा अनभिज्ञ
कचरा संकलन करण्यासाठी विशिष्ट हेतुने ही वाहने तयार करण्यात आली असल्याने त्यांना आरटीओ दर ठरवता येत नाही. याबाबत महापालिकेचे अधिकारी अनभिज्ञ असल्याचे समोर आले असून, मनपा ठेकेदाराला कोणत्या करारानुसार वाहणे देवून महापालिकेचे उत्पन्न वाढवणार आहेत. याबाबत मात्र प्रश्न उपस्थित होत आहे.
नगर – महापालिकेने डीपीआर मंजूर करूण 27 कोटींचा निधी मंजुर केला आहे. या निधीतून महापालिका कचरा संकलनासाठी 64 वाहने खरेदी करणार आहे. दरम्यान महापालिकेने कचरा संकलनाचा तीन वर्षाच्या ठेका पुणे येथील स्वयंभू ट्रान्सपोर्टला दिला असतांना महापालिका स्वयंभूला कचरा संकलनासाठी वाहने खरेदी करूण देणार आहे. त्यामुळे मनपाकडून ठेकेदाराचे उखळ पांढरे करण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे.
महापालिकेन शहरातील कचरा संकलनासाठी पुणे येथील स्वयंभू ट्रान्सपोर्ट ठेका दिला आहे. त्याबदल्यात मनपा स्वयंभूला टनामागे 1 हजार 650 रुपये देणार आहे. शहरात सध्या 120 ते 130 टन कचरा दररोज निघत असून, मनपा स्वयंभूला महिन्याला अंदाजे 65 लाख रुपये द्यावे लागणार आहे. या कचरा संकलनाचा लाखोंचा खर्चांचा बोजा मनपावर पडणार आहे. त्यातच महापालिकेकडून कचरा संकलनासाठी नवीन 64 वाहने खरेदी करण्याचा घाट घातला जात असून ठेकेदाराचे खीसे भरण्याचा प्रयत्न होत आहे.
स्वयंभूला तीन वर्षाचा ठेका दिला असतांना मनपा वाहने खरेदी का करते?, मनपाची वाहणे कचरा संकलन करणार असेल तर मग ठेकेदाराला महिन्याला लाखो रुपये कशासाठी द्यायचे असाही प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेने वाहने खरेदी करूण स्वयंभूला भाडे करारावर दिले तर त्याचा देखभाल दुरुस्ती कोण पाहणार त्याचा खर्च ही मनपाच्या पदरी पडणार असल्याचे ही बोलले जात आहे.
महापालिका वाहने खरेदी करूण स्वयंभूला भाडे तत्वावर वाहने देणार आहे. स्वयंभूचा कचरा संकलनाचा तीन वर्षांचा ठेका संपल्यानंतर ही वाहने भंगारात विकावी लागतील. त्यामुळे मनपाचा कोट्यावधीचा वाहनावरील खर्च डब्यात जाणार असल्याचे दिसत आहे. स्वयंभूने कचरा संकलनासाठी 55 घंटा गाड्या, 10 कंटेनर, 5 कॉम्पॅक्टर खरेदी केले असून प्रत्येक प्रभागासाठी आनखी वाहने खरेदी करणार असतांनाही महापालिका वाहने खरेदी करण्यावर जोर का लावत असल्याचे गुपीत मात्र उलगडायला तयार नाही.
मनपाच्या वाहनाला आरटीओ दर नाही : दीपक पाटील
महापालिका हद्दीतील कचरा संकलनाच्या वाहनांचे दर हे आरटीओ ठरवत नाही. आरटीओ ज्या वाहनांना मीटर आहेत त्या वाहनांना आरटीओ दर ठरवितात. मात्र, मनपाच्या कचरा संकलन करणाऱ्या वाहने हे विशिष्ट हेतुने तयार केलेली वाहने आहेत. त्यामुळे या वाहनांना आरटीओना दर ठरविण्याचे अधिकार नसल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी सांगितले.