विधानसभेनंतर महापालिका आयुक्तांची बदली?

पुणे – विधानसभा निवडणुकीनंतर महापालिका आयुक्त सौरभ राव यांची बदली होण्याची शक्‍यता आहे. आयुक्त राव हे दि.1 नोव्हेंबरपासून महिनाभराच्या प्रशिक्षणासाठी मसुरी येथे जाणार आहेत. त्यानंतर त्यांची बदली राज्यात इतरत्र होण्याची शक्‍यता वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. यापूर्वीच आयुक्तांनी शासनाकडे बदलीसाठी मागणी केली होती. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर त्यांची बदली झाल्यास त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्‍यता असल्याने त्यांची बदली करण्यात आली नव्हती. मात्र, आता निवडणुकांनंतर ही बदली होईल, असा अंदाज आहे.

पुण्यात जिल्हाधिकारी असलेल्या राव यांची 17 एप्रिल 2018 ला महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आली होती. या कालावधील जायका प्रकल्प, एचसीएमटीआर प्रकल्पाला गती तसेच मेट्रोसाठीचे आवश्‍यक निर्णय त्यांच्याच कालावधीत घेण्यात आले आहेत. मात्र, दरम्यानच्या काळात कौटुंबिक कारणास्तव त्यांनी राज्यशासनाकडे बदलीसाठी विनंती केली होती. मात्र, शासनाकडून त्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नव्हता. त्याबाबत सहा महिन्यांपूर्वी जोरदार चर्चा सुरू होत्या. मात्र, आता निवडणुका संपताच राव हे प्रशिक्षणासाठी जाणार आहेत. हे प्रशिक्षण 5 नोव्हेंबरपासून मसुरी येथे होणार आहे. यापूर्वीही महापालिकेचे अनेक आयुक्त प्रशिक्षणासाठी गेल्यानंतर त्यांची बदली झाल्याची उदाहरणे आहेत. दरम्यान, या बाबीस शासनाच्या काही उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला असला, तरी त्याबाबत स्पष्ट बोलण्यास नकार देण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.