मनसेचे जम्बो कोविड रुग्णालयासमोर आंदोलन : मेडब्रोचे लेखी आश्वासन
पिंपरी – करोनाच्या काळात ज्या परिचारिकांवर “करोना योद्धा’ म्हणून स्तुतीसुमने उधळली होती त्यांना करोना रुग्णांची संख्या कमी होताच बेरोजगार करण्यात आले. एवढेच नव्हे, तर वेतनासाठी आंदोलन करण्याची वेळ त्यांच्यावर आणण्यात आली. कराराचा भंग करत, नेहरुनगर येथील जम्बो कोविड रुग्णालयातील 38 परिचारिकांना कामावरुन काढून टाकण्यात आले.
याप्रकरणी मनसेच्या रुपाली ठोंबरे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली या परिचारिकांनी जम्बो कविड रुग्णालयासमोर मंगळवारी (दि.20) आंदोलन केले. आमचे बिल मिळाल्यानंतर परिचारिकांचे वेतन देण्याचे लेखी आश्वासन जम्बोमधील मेडब्रो हेल्थकेअर ठेकेदार संस्थेने आंदोलकांना दिले. तर या रुग्णालयाचे पालकत्व असलेल्या पीएमआरडीएकडे बोट दाखवत महापालिका प्रशासनाने पीएमआरडीएशी पत्रव्यवहार करण्याची तयारी दर्शविली आहे.
हातावर टेकवले अवघे पाच हजार
मोठी प्रसिद्धी करत आणि स्वतःचे कौतुक करुन घेत पीएमआरडीए, राज्य सरकार व महापालिकेच्या आर्थिक सहकार्यातून नेहरुनगर स्टेडियम येथे जम्बो कोविड रुग्णालय उभारण्यात आले. मेसर्स मेडब्रो हेल्थकेअर प्रा. लि. या ठेकेदार संस्थेने श्री लक्षमी व्यंकटेश व्हरायटी ऍन्ड सर्व्हिसेसच्या माध्यमातून परिचारिकांची भरती केली.
प्रतिमहा तीस हजार रुपये वेतन देण्याचा करार केला, असा दावा या परिचारिकांनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यातून या परिचारिका जीवाची जोखीम पत्करुन काम करण्यास तयार झाल्या. मात्र महिनाभरानंतर हातात केवळ पाच हजार रुपयेच टेकवत आर्थिक फसवणूक करत असल्याचा आरोप या परिचारिकांनी केला आहे.
मनसे आक्रमक
दीड महिन्यांच्या कालावधीतच करार बसानात गुंडाळत मेडब्रो संस्थेने 34 परिचारिका व 4 ब्रदर्सना सोमवारी अचानक कामावरुन काढून टाकले. ही बाब समजताच नगरसेवक व मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, मनसेच्या पुणे येथील आक्रमक नेत्या रुपाली-ठोंबरे -पाटील, अश्विनी बांगर, राजू सावळे यांनी जम्बो रुग्णालयासमोर आंदोलन केले. महापालिका प्रशासनाकडून बिले मिळाल्यानंतर परिचारिकांचे थकीत वेतन देण्याचे लेखी आश्वासन मेडब्रो ठेकेदाराने दिले.
पीएमआरडीए प्रशासनाशी पत्रव्यवहार
आंदोलकांनी आपला मोर्चा महापालिकेकडे वळविला. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे उपस्थित नसल्याने याविषयावर अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांनी आंदोलकांशी चर्चा केली. या जम्बो कोविड रुग्णालयाला महापालिकेने आर्थिक सहाय्य केले असून, या रुग्णालयाचे पालकत्व पीएमआरडीएकडे असल्याची बाब निदर्शनास आणून दिली. याप्रकरणी पीएमआरडीएशी पत्रव्यवहार करण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार याबाबत आता महापालिका प्रशासन पीएमआडीए प्रशासनाशी पत्रव्यवहार करणार आहे.