दंड केला वसूल : आरोग्य विभागाची कारवाई
पिंपरी – आकुर्डीतील रेल्वेलाईन जवळील मोकळ्या जागेत राडारोडा टाकणाऱ्या ट्रॅक्टर चालकाकडून दोन हजार रुपयांचा दंड वसूल केला. राडारोडा उचलून पुन्हा ट्रॅक्टरमध्ये भरुन घेतला. तसेच प्लॅस्टिक वापरणाऱ्यांकडून 30 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही कारवाई केली.
निगडी, प्राधिकरण येथील स्वीट जंक्शन यांच्या दुकानात दुबार प्लॅस्टिक बॅगचा वापर केला जात होता. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्याचबरोबर प्राधिकरणातील ओम स्वीट, श्रीजी रेस्टॉरंट या व्यावसायिकांकडे बंदी असलेले प्लॅस्टिक सापडले. त्या दोघांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये असा दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
प्रभाग क्रमांक 10 आणि 14 मधील श्रावणगिरी डोसा, चिंचवड स्टेशन येथील मयूर डायनिंग यांना देखील प्लॅस्टिक बॅग ठेवल्याबाबत पाच हजार रुपयांचा दंड, तसेच शाहूनगर येथील तळीमण डोसा यांच्याकडून देखील पाच हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. याबाबतची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली.