कारवाईनंतर द गुड समॅरिटन स्कूलचे स्पष्टीकरण
पिंपरी – अनावधानाने शाळा आवारात विक्रेत्याला पुस्तक विक्रीस सहमती दिल्याने शिक्षण मंडळाने केलेली कारवाई योग्य आहे. मात्र आरटीआय कार्यकर्त्यांची तक्रार आणि वागणूक चुकीची होती. यापुढे नियमबाह्य कुठलीही साहित्य विक्री शाळेमध्ये होणार नाही, असे स्पष्टीकरण द गुड समॅरिटन शाळा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
महापालिकेच्या शिक्षण मंडळाने द गुड समॅरिटन शाळेवर कारवाई केली. पुस्तक विक्री केल्या जात असलेल्या दोन वर्गखोल्या सील करण्यात आल्या होत्या. यानंतर शाळेने पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. यावेळी मुख्याध्यापक आशिष गायकवाड, पर्यवेक्षिका डॉ. निकिता गायकवाड, पालक प्रतिनिधी शोभा चव्हाण, माजी विद्यार्थी व नगरसेवक ऍड. सचिन भोसले, शैलेश देशमुख यांच्यासह शिक्षक व पालक उपस्थित होते.
मुख्याध्यापक गायकवाड म्हणाले, पालक आणि शाळा प्रशासनात उत्तम समन्वय आहे. करोनामुळे पालकांच्या विनंतीवरून आम्ही येथे विक्रेत्याला जागा उपलब्ध करून दिली होती. मात्र कुठल्याही पालकांना पुस्तक खरेदीसाठी तगादा लावला नाही. एक-दोन पालकांच्या गैरसमजुतीतून हा सर्व प्रकार झाला आहे. त्यांचाही गैरसमज आम्ही दूर करू. मात्र आरटीआय कार्यकर्त्याने पालक नसताना पालक म्हणून खोटी तक्रार केली शाळेच्या आवारात येऊन शिक्षकांसोबत उद्धट वर्तन केल्याचा आरोपही केला आहे.
पालकांच्या मागणीनुसार सर्वांना एकाच ठिकाणी पुस्तके उपलब्ध व्हावीत, म्हणून आमच्या पिटीए बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. पुस्तके खरेदीची सक्ती कोणावरही नव्हती.
– शोभा चव्हाण, पालक प्रतिनिधी