मुंबई – शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांनी एकत्र येत राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. तिन्ही पक्षांनी मिळून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं. मात्र हे तीनचाकी सरकार एक महिना चालणार नाही, एक आठवड्यात कोसळणार, सरकार आज कोसणार असं सातत्याने भाजपकडून सांगण्यात आलं. मात्र सरकार कायम आहे. आता भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारला शेरोशायरीतून तीन महिन्यांची नवीन डेटलाईन दिली आहे.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी मंत्र्यांमध्ये जोरदार वादावादी सुरू आहे. विरोधकांनी अनेक मुद्दांवर सरकारला धारेवर धरण्यात यश मिळवलं आहे. यात देवेंद्र फडणवीस विरुद्ध मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. तर दुसऱ्या फळीत भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख एकमेकांशी भिडले.
विधानसभेत आज मुनगंटीवार आणि देशमुख यांच्यात शेऱोशायरीसह जुगलंबदी रंगली होती. विदर्भातील या दोन नेत्यांनी एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. देशमुख म्हणाले, सुधीरभाऊ तुम्हाला बघून मला जगजीत सिंग यांची गझल आठवते. ‘तुम इतना जो मुस्करा रहे हो, सुधीरभाऊ, तुम इतना जो मुस्करा रहे हो, क्या गम है जिसे छुपा रहे हो.’ देशमुख गझल ऐकवत असताना सुधीर मुनगंटीवार गालातल्या गालात हसत होते.
गृहमंत्री देशमुख यांच्या मिश्कील टीप्पणीला मुनगंटीवार यांनी चोख प्रत्युत्तर दिले. ‘कुछ देर की खामोशी है, फिरसे शोर आयेगा, तुम्हारा सिर्फ तीन महिने का वक्त रहा है, हमारा दौर फिरसे आयेगा,’ असा शेर मुनगंटीवार मारला. भाजपच्या आमदारांनी याला दाद दिली. त्याचवेळी मुनगंटीवार यांच्या तीन महिन्याच्या डेटलाईनने अनेकांच्या भुवया उंचावल्या.