धनंजय मुंडे व जयंत पाटील यांच्यात चुरस
मुंबई : विधानसभा निवडणूकी शिवसेना-भाजपा महायुतीला टक्कर देत राष्ट्रवादी कॉंग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजप, शिवसेनेनंतर राष्ट्रवादीने 54 जागा जिंकत तिसरा पक्ष ठरला आहे. 2014च्या तुलनेत राष्ट्रवादीच्या जागा वाढल्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी कॉंग्रेसला मिळणार आहे. मात्र, या पदासाठी आता राष्ट्रवादीमधून ज्येष्ठ नेते जयंत पाटील व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते व नुकतेच विधानसभेवर निवडून आलेले धनंजय मुंडे या दोघांमध्ये चुरस लागली आहे. मात्र, याबाबतचा अंतिम निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत भाजप 105, शिवसेना 56, राष्ट्रवादी कॉंग्रेस 54, कॉंग्रेसने 44 जागा जिंकल्या आहेत. जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार ज्या पक्षाचे जास्त आमदार निवडून येतील त्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळते. 2014च्या विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पराभूत झाल्याने त्यांना विरोधी बाकावर बसावे लागले होते. त्यावेळी कॉंग्रेसचे 41, तर राष्ट्रवादीचे 40 आमदार जिंकले होते. त्यानुसार साहजिकच कॉंग्रेसच्या गळ्यात विधानसभेतील विरोधीपक्षनेतेपदाची माळ पडली होती. मात्र, आता याच्या नेमके उलटे झाले आहे.
राष्ट्रवादीने यंदाच्या निवडणूकीत कॉंग्रेसपेक्षा जास्त जिंकल्या आहेत. त्यामुळे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी राष्ट्रवादीला मिळणार आहे. जागावाटपाच्या फॉर्म्युल्यानुसार हे ठरलेले सुत्र आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. तर ठरलेल्या गणितानुसार ज्याचे जास्त आमदार त्याला विरोधी पक्षनेतेपद मिळते, असे सांगत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राष्ट्रवादीलाच विरोधी पक्षनेतेपद मिळणार असल्याचे संकेत दिले.
दिवाळीनंतर निर्णय
विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये विधानसभेचे गटनेते जयंत पाटील व विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते तसेच नुकतेच विधानसभा निवडणूकीतील पंकजा मुंडेचा पराभव करणारे धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा आहे. जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यामुळे एक व्यक्ति एक पद यानुसार त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळण्याची शक्यता कमी आहे. तर दुसरीकडे मुंडे हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. विधानपरिषदेत त्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात जोरदार हल्लाबोल केला होता. त्यामुळे मुंडे यांनाच विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी मिळेल, अशी चर्चा आहे. मात्र, दिवाळीनंतर याबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार चर्चा करून अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती राष्ट्रवादीच्या सुत्रांनी दिली.