मुंबई – लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) ने भरलेले तीन टॅंकर घेऊन रो-रो सेवा 25 एप्रिल, 2021 रोजी संध्याकाळी 18.03 वाजता गुजरातमधील हापा येथून निघाली आणि 26 एप्रिल, 2021 रोजी सकाळी 11.25 वाजता महाराष्ट्रातील कळंबोलीला पोहोचली. ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या जलद वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडॉर देण्यात आला होता. रेल्वे मंत्रालयामार्फत चालविल्या जाणाऱ्या ऑक्सिजन एक्सप्रेस गाड्यांद्वारे देशभरातील कोविड-19 रुग्णांच्या उपचारासाठी वैद्यकीय ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात येत आहे.
ऑक्सिजन एक्स्प्रेसने 860 किलोमीटरचा प्रवास केला आहे. या टॅंकरमध्ये अंदाजे 44 टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन भरलेला आहे. ऑक्सिजन एक्स्प्रेसच्या सुरळीत वाहतुकीसाठी कळंबोली कारशेड येथे आवश्यक ती व्यवस्था करण्यात आली आहे. ऑक्सिजन एक्स्प्रेस हापा येथून विरंगम, अहमदाबाद, वडोदरा, सुरत, वसई रोड आणि भिवंडी रोड मार्गे सुरक्षेचे सर्व निकष पाळत कळंबोलीला पोहोचली आहे. जामनगरमधील मेसर्स रिलायन्स इंडस्ट्रीजकडून या ऑक्सिजन टॅंकरचा पुरवठा करण्यात आला आहे.
रेल्वेने आतापर्यंत मुंबई ते विशाखापट्टणममार्गे नागपूर ते नाशिक आणि लखनौ ते बोकारो आणि परत अशी ऑक्सिजन एक्स्प्रेस चालविली असून 25.4.2021 पर्यंत सुमारे 150 टन लिक्विड ऑक्सिजन आणला आहे. अशा प्रकारच्या आणखी ऑक्सिजन एक्स्प्रेस’ देशाच्या विविध भागात चालवणे नियोजित आहे.