मुंबईची जुही कजारिया दहावीत देशात पहिली

आयसीएसई बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर

पुणे – आयसीएसई बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या बोर्डाचा दहावीचा निकाल 98.54 टक्के लागला असून बारावीचा निकाल 96.52 टक्के इतका लागला आहे. दहावीच्या परीक्षेत मुंबईची जुही कजारिया देशात पहिली आली आहे. तर बारावीच्या परीक्षेत कोलकात्याचा देवांग कुमार अगरवाल आणि बंगळुरुची विभा स्वामीनाथन यांनी 100 टक्के गुण मिळवत अव्वल क्रमांक पटकावला आहे. बारावीत मुंबईच्या मिहिका सामंत हिने 99.75 टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला आहे. दहावीच्या पहिल्या तीन क्रमांकात महाराष्ट्रातील 16 विद्यार्थ्यांचा समावेश असून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

आयसीएसई बोर्डाचा दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे निकाल मंगळवारी दुपारी तीन वाजता जाहीर झाले. आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत मुंबईच्या जमनाबाई नर्सी शाळेच्या जुही कजारिया हिने 99.60 टक्‍के गुणांसह देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर मुंबईच्या फोरम संजनवाला, अनुश्री चौधरी, अनुष्का अग्निहोत्री, ठाण्याचा यश भन्साळी यांनी 99.40 टक्के गुणांसह देशात संयुक्तपणे दुसरा क्रमांक पटकावला आहे. यंदा आयसीएसई दहावीची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान झाली. तर, आयसीएसई बारावीची परीक्षा 4 फेब्रुवारी ते 25 मार्च दरम्यान घेण्यात आली होती.

त्याचबरोबर नाशिकची दृष्ठी अत्तर्डे, मुंबईचे विर बंन्साली, जुगल पटेल, करन अंडराडे, झरवान श्रॉफ, हुसेन बसराई, अमन झवेरी, हर्ष वोरा आणि ठाण्याचा अदित्य वाकचौरे यांनी 99.20 टक्के गुण मिळवून देशात संयुक्तपणे तिसरा क्रमांक पटकावला आहे. दहावीच्या परीक्षेत देशात पहिल्या तीन क्रमांकात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 16 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच, आयसीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत महाराष्ट्रातील मुंबईची मिहिका सामंत असून हिने 99.75 टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक मिळवला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.