मुंबईची तरुणी पुण्यात कास्टिंग ‘काउच’ची शिकार 

पुणे : टीव्ही मालिकांमध्ये काम मिळवून देण्याच्या बहाण्याने मुंबईतील एका तरुणीला पुण्यात आणून तिच्यावर दोघांनी बलात्कार करण्याचा प्रकार समोर आला आहे.

तीने शरीरसंबंधाला नकार दिल्यावर तीच्या हातावर बिअर बाटली फोडून जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवण्यात आले. एका तरुणीनेच या तरुणीला काम मिळवून देते, असे सांगून आरोपींशी ओळख करुन दिली होती.

याप्रकरणी मुंबईतील अंधेरी येथे राहणाऱ्या एका 28 वर्षाच्या तरुणीने विमानतळ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ही घटना विमाननगरमधील हॉटेल एच एच आयमध्ये 9 फेब्रुवारी रोजी घडली होती.

याप्रकरणी भालचंद्र प्रमोद कोलवाडकर(रा.नागपूर), समीर विजय चौधरी आणी छाया नावाच्या एका महिलेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छाया नावाच्या एका महिलेने या तरुणीला तिच्या ओळखीच्या निर्माता आणि  दिग्दर्शकांकडून टीव्ही मालिकामध्ये काम मिळवून देते, असे सांगितले होते. त्यानंतर तिला घेऊन छाया कॅबने मुंबईहून पुण्यात आली होती. विमाननगर येथील एच. एच. आय हॉटेलमध्ये तिची राहण्याची व्यवस्था केली. छायाने नागपूर येथील दोघांची तिने निर्माता, दिग्दर्शक म्हणून ओळख करुन दिली.

तिच्या खोलीमध्ये त्यांनी मध्यरात्रीपर्यंत मद्यपान केले. त्यानंतर त्यांनी या तरुणीकडे शरीरसुखाची मागणी केली. तिने शरीरसुखास नकार देताच छाया हिने तिच्या हातातील बीयरची बाटली तिच्या हातावर मारुन तिला जखमी केले.

त्यानंतर दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. विमानतळ पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून नागपूरच्या निर्माता, दिग्दर्शकांना पकडण्यासाठी पोलीस पथक रवाना झाले आहेत. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मुजावर करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.