बारामती : महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या यजमान पदाखाली बारामती येथे सुरू असलेल्या २३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक वरिष्ठ पुरूष व महिला गट कबड्डी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सायंकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात पुरूष विभागात मुंबई शहर पूर्व तर महिला विभागात पुणे ग्रामीण संघांनी विजेतेपद मिळविले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, अतिरिक्त पोलीस अधिक्षक गणेश बिरादार, क्रीडा उपसंचालक युवराज नाईक, विभागीय अधिकारी वैभव नावडकर, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी गजानन पाटील, राज्य बॅकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, सुहास मापारी, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह बाबुराव चांदेरे, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, दादा देवकाते, स्पर्धा निरिक्षक रविंद्र देसाई, पंच प्रमुख सदानंद मांजलकर, सहपंचप्रमुख अनिल यादव, पुणे जिल्हा कबड्डी असोसिएसनचे कार्याध्यक्ष दत्तात्रय कळमकर, सचिव दत्तात्रय झिंजुर्डे, अर्जुन पुरस्कार विजेते शांताराम जाधव, शकुंतला खटावकर व माया आक्रे आदी उपस्थित होते.
खेळांडूंकडे जिंकण्यासाठी खिलाडू वृत्ती असावी. खेळाडूंनी सर्वोत्तम क्षमतेने खेळले पाहिजे. बारामतींकरांना कला क्रीडा, सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात आनंद मिळाला पाहिजे यासाठी माझा सातत्याने प्रयत्न असतो असे सांगत खेळाडूंना भरीव बक्षिस मिळावे अशी सकारात्मक भूमिका असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती येथे केले. ते बारामती येथे छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
पुणे ग्रामीण व मुंबई शहर पुर्व पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबई शहर पुर्व संघाने पुणे ग्रामीण संघावर ३५-३१ असा विजय मिळवित छत्रपती शिवाजी महाराज चषकावर आपले नाव कोरले. मद्यंतराला मुंबई शहर पुर्व संघाकडे १७-९ अशी आघाडी होती. मुंबई शहर पुर्वच्या प्रणय राणे व शार्दुल पाटील यांनी आपल्या जोरदार खेळाच्या जोरावर आपल्या संघाला विजय मिळवून दिला. तर संकेत सावंत याने उत्कृष्ठ पकडी घेतल्या. पुणे ग्रामीणच्या अक्षय सूर्यवंशी व अजित चौहान, जीवन डोंबले यांनी जोरदार प्रतिकार केला. तर स्वप्नील कोळी याने पकडी घेतल्या.
पुणे ग्रामीण व मुंबई शहर पश्चिम
महिलांच्या अंतिम सामन्यात पुणे ग्रामीण संघाने मुंबई शहर पश्चिम संघावर ३७-२८ असा विजय मिळवित छत्रपती शिवाजी महाराज चषकावर आपले नाव कोरले. मद्यंतराला पुणे ग्रामीण संघाकडे २०-१५ अशी आघाडी होती. पुणे ग्रामीणच्या खेळाडूंनी सामन्याच्या सुरवातील अत्यंत अडखळत सुरवात केली होती. मात्र थोड्यात वेळा सलोनी गजमल व निकिता पडवळ यांनी आपल्या अत्यंत आक्रमक खेळाने संघाला सावरले व संघाला विजय मिळवून दिला. रेखा सावंत हिने मुंबई शहर पश्चिमची संघनायक असलेल्या सोनाली शिंगटेच्या पकडी घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. मुंबई शहर पश्चिमच्या सोनाली शिंगटे हिने एकाकी लढत दिली. तर पूर्णिमा जेधे व साधना विश्वकर्मा यांनी चांगल्या पकडी केल्या.