खळबळजनक! लग्नाला नकार दिल्याने तरूणीला धावत्या लोकलसमोर ढकललं…, घटना CCTVत कैद

मुंबई – लग्नाला नकार दिल्याने तरूणीला धावत्या लोकलसमोर ढकलल्याची धक्कादायक घटना मुंबईतील खार रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सायंकाळी घडलीय. या घटनेत तरूणी गंभीर जखमी झाली असून, तब्बल 12 टाके लागले आहेत. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी पोलीसांनी तरूणाला अटक केली आहे. त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जखमी झालेली तरूणी आणि तिला धक्का देणार तरूण हे दोन वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. दोघेही एकाच ठिकाणी कामाला असल्याने त्यांच्यात चांगले मित्रत्वाचे संबंध निर्माण झाले. मात्र, काही दिवसांनी तरूणाला दारूचं व्यसन असल्याचे तरूणीला समजले. तेव्हापासून ती त्याच्यापासून अंतर ठेवून राहत होती. मात्र, आरोपी तरून तिला त्रास देत होता. पोलीसांत तक्रार दिल्यानंतरही त्याचे त्रास देणे सुरूच होते.

सुमेध जाधव (रा. वडाळा) असे आरोपी तरूणाचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी सुमेध तिचा पाठलाग करत होता. पाठलाग करत तो अंधेरी रेल्वे स्थानकावरून लोकलमध्ये चढला. त्यानंतर तरूणीने तिच्या आईला मदतीसाठी फोन केला. रेल्वे स्टेशनवर तरूणी आईला भेटली. त्यानंतरही तो तिचा पाठलाग करतच होता. तिथेच त्याने लग्न करण्यासाठी विचारणा केली. मात्र, तरूणीने त्याला नकार दिला.

नकार दिल्यानंतर सुमेधने स्वत:ला संपवण्याची धमकी देऊन तो रेल्वे स्थानकात येणाऱ्या गाडीच्या दिशेने धावला, पण अचानक थांबून पुन्हा परत आला. त्यानंतर तरूणीला जबरदस्तीने पकडून लोकल्या दिशेला नेले. रेल्वे स्थानकातून सुटताच त्याने तिला रेल्वे आणि प्लॅटफाॅर्मच्या मध्ये ढकलले. तरूणीच्या आईने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. या झटापटीतच तिच्या डोक्याला जबर मार लागला. जखमी तरूणीला रूग्णालयात दाखल करण्यात आले असून, तिला 12 टाके पडले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.