मुंबईतील फरार संशयिताला साताऱ्यात अटक 

 

सातारा-मुंबई येथील कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून आणल्याने अपहरणाचा गुन्हा दाखल असलेल्या दिनेश परशुराम शिर्के (रा. बोरीवली,मुंबई) या संशयिताला सातारा पोलिसांनी अटक केली. त्याच्यासोबत असलेल्या अल्पवयीन मुलीलाही सातारा पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, मुंबई येथील कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात काही दिवसांआधी संशयिताने व एका मुलीने पळून लग्न केल्याने त्या मुलीच्या घरातील लोकांच्या तक्रारीवरून संशयिताविरोधात मुलीचे अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. तेव्हापासून संशयित व त्याच्यासोबत असलेली अल्पवयीन मुलगी ही साताऱ्यात राहत होती.

याबाबत मुंबई पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सातारा पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड यांना कारवाईच्या सुचना दिल्या होत्या. जऱ्हाड व त्यांचे सहकारी याबाबत मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सातारा शहर व परिसरात संशयिताचा शोध घेत होते. बुधवारी जऱ्हाड हे महामार्गावर पेट्रोलींग करत असताना एक युवक व त्याच्यासोबत असलेली अल्पवयीन मुलगी एका ट्रकमधून साताऱ्यातून कोल्हापूरच्या दिशेने जात असताना त्यांच्या निदर्शनास आली.

जऱ्हाड यांनी तात्काळ ट्रकचा पाठलाग करून त्या दोघांना ताब्यात घेतले व विचारपूस केली असता; दोघे मुंबईतून पळून आल्याची माहिती त्यांच्याकडून मिळाली. त्यानंतर त्यांना ताब्यात घेत, पुढील कार्यवाहीसाठी कस्तुरबा मार्ग पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, सहाय्यक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, जोतीराम घोरपडे, हवालदार दीपक मोरे, शरद बेबले,मुनीर मुल्ला, निलेश काटकर,संजय जाधव व इतर महिला कर्मचाऱ्यांनी केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.