मुंबई – ‘पठाण’च्या रिलीजला आता कमी कालावधी शिल्लक आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी शाहरुख खानच्या चाहत्यांच्या मनात ‘पठाण’बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वाढत आहे. अशा परिस्थितीत शाहरुख खानने चाहत्यांच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी शाहरुखने आस्क मी सेशन ठेवले होते. या सत्रादरम्यान, शाहरुखला नेटकऱ्यांनी जबरदस्त प्रश्न विचारले तितक्याच हटके अंदाजात शाहरुखने देखील चाहत्यांना उत्तरे दिली. एकाने तर शाहरुखला थेट त्याच्या फोनवर आलेला ओटीपीच मागितला.
शाहरुख खानने चाहत्यांसोबत ठेवलेल्या या सेशनमध्ये एका सोशल मीडिया यूजरने शाहरुखला ट्विट करत,ओटीपी आला असेल तो सांगावा अशी विनंती केली. यावर शाहरुखने या पठ्ठयाला उत्तर तर दिलेच शिवाय मुंबई पोलिसांनी देखील यावेळी शाहरुखची साथ दिल्याचे दिसून आले. ओटीपी मागणाऱ्या नेटकऱ्याला शाहरुख म्हणतो,””बेटा, मी खूप प्रसिद्ध आहे, मला OTP माहित नाही… मी ऑर्डर करतो तेव्हा विक्रेते फक्त माल पाठवतात… तू तुझ बघ.” शाहरुखच्या या उत्तरावर अनेकांना हसू आवरले नाही.
खरी मजा तेव्हा आली जेव्हा या ट्विट प्रकरणात मुंबई पोलिसांची एंट्री झाली. ओटीपी मागणाऱ्या नेटकऱ्याला मुंबई पोलिसांनी ट्विट करत 100 असे उत्तर दिले. यानंतर मात्र चाह्ह्त्यांनी कमेंटचा पाऊसच पाडायला सुरुवात केली. मुबई पोलिसांनी हटके स्टाईलने दिलेले हे उत्तर सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय बनले आहे. शाहरुखचा पठाण चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.