अनिल देशमुख यांची माहिती; तेजल प्रभू यांचे कृत्य असल्याचा पोलिसांचा दावा
मुंबई : जेएनयुविरोधातील हिंसाचरा दरम्यान निदर्शने करताना स्वतंत्र काश्मिरचे फलक दाखवणाऱ्या महिलेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. मुंबई पोलिसांनी तिची ओळख पटवली असून तिचे नाव तेजल प्रभू उर्फ महेक मिर्झा प्रभू असे असून त्या कवी आणि कथाकथनकार आहेत.
गेटवे ऑफ इंडिया हे निदर्शने करण्याचे स्थळ नव्हे. त्यामुळे मुंबईकरांना त्रास होईल, वाहतुकीचा प्रश्न निर्माण होईल. आम्ही गेट वे ऑफ इंडियावर आंदोलन करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्याविरोधात गुन्हा नोंदवला नाही. तर आम्ही केवळ आंदोलनाची जागा आझाद मैदानावर स्थलांतरीत केली आहे, असे देशमुख म्हणाले.
स्वतंत्र किश्मिरचा फलक घेऊन फिरणाऱ्या महिलेची ओळख पोलिसांनी पटवली आहे. आम्ही तिची ओळख पटवली असून तिच्यावर गुन्हा नोंदवणयात येईल. आंदोलकांना अडचणीत आणणारे फलक त्यांनी आणू नयेत, असे आवाहन आम्ही केले आहे, असे देशमुख म्हणाले.
मुंबई पोलिसांनी मंगळवारी सकाळी गेट वे ऑफ इंडियावर निदर्शने करणाऱ्या आंदोलकांना तेथून आंदोलन आझाद मैदानात करण्यास भाग पाडले. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात बुरखाधारी गुंडांनी विद्यार्थी आणि शिक्षकांवर लाठ्या, लोखंडी सळ्या आणि हातोड्यांनी हल्ल चढवला. त्यानंतर त्याचे देशभर पडसाद उमटले. सुमारे 50 निदर्शकांनी गेट वे ऑफ इंडियावर निदर्शने रविवारी सायंकाळी सुरू केली. सोमवारीही या आंदोलनाची तीव्रता वाढली. मंगळवारी त्यांनी हॉटेल ताजच्या बाजूला आंदोलन सुरू केले. त्यावेळी पोलिसांनी दोन किमी अंतरावरील आझाद मैदानावर जाण्यास त्यांना भाग पाडले.