मुंबई – ‘तुझ्या गर्भात वाढणारं बाळ माझं नाही. ते काढून टाक. तुझं बाहेर कोणाबरोबर तरी संबंध आहेत, असं म्हणत मुंबईत पोलीस उपनिरीक्षकाने गर्भवती पत्नीच गळा दाबत तिच्या पोटावर लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पोटात जोरात लाथ मारल्यामुळे रक्तस्त्राव होऊन पत्नीचा गर्भपात झाला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने तक्रार दाखल केली असून विजापूर नाका पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई शहरात आरोपी पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.
पीडितेचे 2020 साली मुंबईत पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत अससेल्या अधिकाऱ्यासोबत सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथे विवाह संपन्न झाला होता. लग्नानंतर आरोपी आपल्या पत्नीला घेऊन मुंबईत आपल्या कुटुंबासोबत राहायला आला. याठिकाणी काही दिवस आरोपीने पत्नीला चांगली वागणूक दिली. त्यानंतर, सासू, सासरे, दीर हे छोट्या छोट्या कारणांवरून तिला त्रास देऊ लागले. अशी माहिती पीडितेने आपल्या तक्रारीत दिली आहे.
त्यानंतर एके दिवशी आरोपी पोलीस अधिकाऱ्यानं चारित्र्यावर संशय घेत महिलेला मारहाण केली आहे. तसेच तिच्या पोटावर जोरात लाथ मारून तिचा गर्भपात घडवून आणला आहे. दरम्यान दीराने वाईट हेतूनं आपला विनयभंग केल्याचा दावाही पीडित महिलेने केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.