मुंबई : मुंबईतील 55 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या पोलिसांना रजा मंजूर करण्यात आली आहे. त्याशिवाय, मधुमेह, उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या 52 वर्षांवरील मुंबई पोलिसांनाही ऑफ ड्युटी राहण्याची मुभा देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात करोना संकटामुळे चिंतेचे वातावरण आहे. अशातच करोनाविरोधी लढ्यात अग्रेसर राहून कर्तव्य बजावणाऱ्या राज्यातील 100 हून अधिक पोलिसांना करोनाची बाधा झाली आहे. त्यामध्ये मुंबईत सेवा बजावणाऱ्या पोलिसांची संख्या मोठी आहे. एवढेच नव्हे तर, मागील 3 दिवसांत मुंबईत 3 पोलिसांचे करोना संसर्गामुळे निधन झाले.
त्या तिघांनीही वयाची पन्नाशी पार केली होती. ती बाब ध्यानात घेऊन मुंबई पोलीस दलाने सावधगिरीचे पाऊल उचलले आहे. अधिक वय असणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या आरोग्याच्या काळजीपोटी त्यांना घरीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबरच पोलीसही करोनाविरोधी लढ्यात अग्रेसर असणारे मोलाचे शिपाई ठरले आहेत.
प्रामुख्याने लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंन्सिगची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस निष्ठेने कर्तव्य बजावत आहेत. नागरिकांचा करोनापासून बचाव करण्याच्या उद्देशातून पोलीस स्वत:चा जीव धोक्यात घालून ड्युटी बजावतात. आता त्यांच्याही आरोग्याची काळजी घेण्यासाठी मुंबई पोलिसांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.