मुंबई – मागील काही दिवसांमध्ये अनेकांनी मुंबई पोलिसांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांचे कौतुक केले आहे. हे पोलीस दल जगातील एक उत्तम पोलीस दल असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केले आहे.
न्यायाधीश संभाजी शिंदे आणि न्यायाधीश मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने मुंबई पोलिसांबाबत हे मत सुनैना होले यांच्या याचिकेवर सुनावणी दरम्यान व्यक्त केले. न्या. शिंदे म्हणाले कि, आधीच मोठ्या तणावाखाली असताना देखील महामारीच्या समयी मुंबई पोलिसांचे काम हे खूपच अवघड बनले होते. तरीही पोलीस अधिकारी सातत्याने काम करीत होते. ते १२ तासांहून अधिक काळ काम करीत होते. त्यानंतर सुरु झालेले मोर्चे आणि सणवार यांच्यासाठीही बंदोबस्तावर ते तैनात होते.
न्यायालयाला वकिलांनी सांगितले की, सुनैना होले पोलिसांना सहकार्य करीत नाहीत. यावर न्या. शिंदे म्हणाले, जगातील सर्वाधिक उत्तम पोलिसांमध्ये मुंबई पोलिसांची गणना केली जाते. मुंबई पोलिसांची तुलना थेट स्कॉटलंड यार्ड पोलिसांशी केली जाते.त्यामुळे नागरिकांनी त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे.
दरम्यान, होले यांना २ नोव्हेंबरपूर्वी पोलिसांसमोर हजेरी लावण्याचे आदेश खंडपीठाने दिले. तसेच याप्रकरणी पुढील सुनावणी २३ नोव्हेंबर रोजी निश्चित केली.