मुंबई : राज्याचे माजी मंत्री, काँग्रेसचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची काही महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली होती. त्यांच्या हत्येने राज्यात खळबळ उडाली होती. बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणी लाँरेन्स बिष्णोई गँगमधील मारेकऱ्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी खळबळजनक दावा केला आहे.
का करण्यात आली हत्या?
बाबा सिद्दीकींची हत्या करण्यासाठी बिष्णोई गँगकडे तीन प्रमुख कारणे होती. यामध्ये अभिनेता सलमान खानसोबतची जवळीक हे प्रमुख कारण होते. तर, दुसरं कारण हे कोठडीत आत्महत्या केलेल्या अनुज थापनचा बदला घेणे आणि तिसरं कारण म्हणजे बिष्णोई गँगची दहशत प्रस्थापित करण्यासाठी सिद्दीकींची हत्या करण्यात आली असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.
‘त्या’ रात्री नेमके काय घडले?
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सिद्दीकी यांचे पुत्र आणि तत्कालीन आमदार झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे पूर्वेतील कार्यालयाबाहेरच हा गोळीबार झाला होता. रात्री नऊच्या आसपास बाबा सिद्दीकी कार्यालयातील कामकाज उरकून आपल्या घराकडे निघाले होते. त्यावेळी कार्यालयाबाहेर दबा धरून बसलेल्या तीन जणांनी सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला. दसऱ्याच्या दिवशी ही हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राज्यात मोठी खळबळ उडाली होती.