मुंबई : मुंबई उत्तर पश्चिमचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्या मेहुण्याविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या भरत शाह यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. भरत शाह यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धमकी देणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. खासदार रवींद्र वायकर यांचा मेहुणा मतमोजणीच्या दिवशी नेस्को सेंटरमध्ये मोबाईलचा वापर करत असल्याची तक्रार भरत शाह यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. आता त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
लोकसभा निवडणुकीत केवळ 48 मतांनी विजयी झालेल्या रवींद्र वायकर यांच्या मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघात ईव्हीएमध्ये (EVM) घोळ झाल्याचा आरोप विरोधी पक्षातील काही नेत्यांनी केला होता. यादरम्यान ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल हा रवींद्र वायकर यांच्या मेव्हण्याच्या हाती असल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली. त्यानंतर, विरोधी पक्षातील नेत्यांनी ईव्हीएमच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
निवडणूक आयोगाने दिले स्पष्टीकरण
विरोधकांनी हे प्रकरण उचलून धरल्यानंतर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन त्यावर स्पष्टीकरण दिले. ईव्हीएम हे स्वतंत्र डिव्हाईस असून त्याला कुठलीही मोबाईल कनेक्टीव्हीटी नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले होते.