– राजेश पुरंदरे
दक्षिण मुंबईत कुलाबा, मुंबादेवी, वरळी या उच्चभ्रू वस्तीबरोबरच उमरखाडी, भायखळा, शिवडी हे कष्टकरी जनतेचे विधानसभा मतदारसंघही आहेत. धनाढ्य व गरीब अशा या मिश्र मतदारसंघात कोणाचा झेंडा फडकणार?
यंदा विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा, अजय चौधरी, अमीन पटेल, यामिनी जाधव यांच्यासह आदित्य ठाकरे यांची तुल्यबळ उमेदवारांसोबत लढाई होणार आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, अधिकृत व अनधिकृत बांधकामे, दुकाने व्यवसाय करणार्यांच्या जटिल समस्या, फेरीवाले, वाहनतळ, मंत्रालय, विधानभवन, गेटवे ऑफ इंडिया, पंचतारांकित ताज व ओबेरॉय हॉटेल, बड्या उद्योगपतींची निवासस्थाने, नौसैनिक तळ, ससून डॉक, लव्ह ग्रोव्ह पंपिंग स्टेशन व भायखळ्याची राणी बाग, चर्चगेट स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई महानगरपालिका, ब्रेबॉर्न व वानखेडे स्टेडियम, गिरगाव चौपाटी अशी महत्त्वाची स्थळे येथे आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला खड्यासारखे बाजूला सारून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे अरविंद सावंत यांना मतदारांनी भरघोस पाठिंबा देऊन जिंकवले. एकमेव वरळीचा थोडासा उच्चभ्रू वस्तीचा भाग वगळता उर्वरित पाच विधानसभा मतदारसंघात सावंतांच्या बाजूने मतदान होताना दिसून आले. तथापि, मनसेचे उमेदवार या निवडणुकीत नसल्यामुळे मतदारांनी मराठी खासदारांस पसंती दिली अशी चर्चा नंतर रंगली; परंतु त्यात फारसे तथ्य नव्हते.
तर काम करण्यात पुढे असलेले शिवसैनिक तळागाळापासून उच्चभ्रूंच्या सेवेत अनेक प्रसंगात सोबत राहिल्यामुळे या मतदारसंघात उबाठा शिवसेनेने प्राबल्य मिळवले. त्यामुळे विधानसभेत येथे भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे तगडे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असूनही मविआच्या बाजूने येथील मतदार मोठ्या प्रमाणात मतदान करेल असा विश्वास वाटत आहे.
परंतु मतदारांना गृहीत धरण्यासारखे हे सहा विधानसभा मतदारसंघ नाहीत. कुलाबाची स्थिती पाहता तिथे वाहनतळ, अनधिकृत दुकाने, फेरीवाले, अनधिकृत बांधकामे, सुशोभिकरण व व पुनर्विकासाचे मुद्दे ऐरणीवर आहेत. परंपरागत कुलाबा मतदारसंघात भाजपचेच वर्चस्व राहिलेले आहे. म्हणूनच 2019च्या विधानसभा निवडणुकात राहुल नार्वेकर हे निवडून आले. मुंबादेवीतले चित्र मात्र भाजपसाठी फारसे आशादायी नाही. येथे काँग्रेसचे अमीन पटेल यांचे मतदारांशी वैयक्तिक संबंध खूपच जवळचे आहे. दोन वर्षांपूर्वी जातीय तणाव निर्माण होताच त्यांनी घेतलेली नरमाईची भूमिका सर्वांना भावली.
म्हणूनच राज पुरोहितांचा 2019 मध्ये पराभव करणे पटेलांना शक्य झाले होते. यावेळी तर भाजपाच्या विरोधातील एकगठ्ठा मते पटेलांनाच मिळतील अशी अपेक्षा काँग्रेसला आहे. मलबार हिल या उच्चभ्रू वस्तीच्या मतदारसंघात आजवर भाजपचेच प्राबल्य दिसलेले आहे. येथे काँग्रेसचे त्या वेळेचे नेते मिलिंद देवरा सोडले तर मंगलप्रभात लोढा यांच्याशिवाय दुसर्या कोणाचा विचार करणे भाजपालाही शक्य नाही. पक्षातील हा वजनदार नेता गेली अनेक वर्षे मलबार हिलचा गड राखून आहे. मलबार हिलमधील बाणगंगे जवळची कर्मचारी वसाहत असूनही लोढांनी तेथे वाखाणण्याजोगे कार्य केलेले आहे. इथली वाहतूक व्यवस्था काही वेळ जटिल समस्या निर्माण करत होती; परंतु पर्याय सापडत नसल्यामुळे वाहनधारक गुपचूप होते. आता कोस्टल रोड झाल्यामुळे वाहतुकीचा निम्मा ताण कमी झाला आहे. त्यामुळे हा प्रश्न लोढांना त्रास देणारा नाही.
पलीकडल्या बाजूला भायखळा मतदारसंघात महायुतीतील यामिनी जाधव आमदार आहेतच. त्यांचे कार्यही चांगले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ‘लाडकी बहीण’ अशी सध्याची त्यांची ख्याती आहे. सर्व संकट लीलया पार करणार्या नेत्या अशी त्यांची विशेष ओळख आहे. त्यांना तिथे अरुण गवळींची मुलगी गीता गवळी यांचे आव्हान आहे. त्या उबाठामार्फत उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात होत्या. काँग्रेसवाल्यांमुळे गीता गवळींना यश आले नाही. मधु चव्हाणांची तिथे खूप धडपड होती. पण काँग्रेसला एमआयएमच्या वारीस पठणांमुळे या मतदारसंघाची शाश्वती देणे शक्य वाटत नाही म्हणूनच या मतदारसंघांवर सध्या यामिनी जाधव यांचाच प्रभाव आहे असे मानले जाते. शिवडी विधानसभा मतदारसंघात अजय चौधरींमुळे मनसेचे बाळा नांदगावकर यांच्या पुढ्यात आव्हान उभे ठाकले आहे.
मनसेची या मतदारसंघातली बांधणी चुकली असली तरीही भाजपच्या व अधिकृत शिवसेनेच्या छुप्या पाठिंब्याने शिवडीची जागा मनसे पुन्हा आपल्याकडे खेचू शकेल अशी आशा मनसेला आहे. परंतु अजय चौधरीनांही कमी लेखून चालण्यासारखे नाही. एक म्हणजे चौधरी उद्धव ठाकरे यांच्या पडत्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले तसेच त्यांनी 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरुद्ध विजय मिळवताना तब्बल वीस हजारांहून अधिक मताधिक्य घेतले होते. सद्यराजकीय परिस्थितीत त्यांचे हे मताधिक्य तुटणे उबाठा शिवसेनेला शक्य वाटत नाही. ते मतदारांचा कल आपल्याच बाजूने आहे असे गृहीत धरून कार्य करत आहेत. त्याच्या शेजारचा वरळी मतदारसंघ हा देशाचे लक्ष वेधून घेत आहे.
येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू व पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे पुन्हा नशीब आजमावत आहेत. गेल्या वेळी त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराविरुद्ध मोठे मताधिक्य घेतले होते. यंदा मात्र त्यांना मनसेच्या संदीप देशपांडे यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. वरळी कोळीवाडा असो बिडीडी चाळीतील रहिवाशांच्या समस्या सोडवण्यात मनसेने पुढाकार घेतला आहे. उमेदवारांची वानवा किंवा ठाकरेंबाबत त्यांच्या गटांत दोन मतप्रवाह आहेत. त्यामुळे सध्यातरी हा मतदारसंघ ठाकरेच कायम राखतील अशी चिन्हे आहेत.
एकंदरीत सर्व विधानसभा मतदार संघाचा विचार करता भाजप-शिंदेंची शिवसेना, काँग्रेस व उबाठा शिवसेना असे या मतदारसंघातील निवडणुकीनंतरचे चित्र असल्याची कल्पना केली जात आहे. तरीही मविआ या मतदारसंघात त्यांचेच उमेदवार जास्तीत जास्त निवडून येण्याची अपेक्षा धरत आहे. महाराष्ट्रातून उद्योग परराज्यात गेले याचा प्रचार इथे घरोघरी झाला आहे. तसेच इथे मराठी टक्का थोडाफार जास्त प्रमाणात मविआच्याच बाजूने आहे असे त्यांचे मत आहे. निकालानंतरच चित्र स्पष्ट झाल्यावर दक्षिण मुंबईत झेंडा कोणाचा फडकेल हे स्पष्ट होईल.