राजेश पुरंदरे
उत्तर-मध्य मुंबईत प्राबल्य कोणाचे हे आजवर स्पष्ट झालेले नाही. या मतदारसंघातील विधानसभा क्षेत्र कधी काँग्रेस, कधी एकसंध शिवसेना, कधी भाजपा यांच्याकडे झुकलेला राहिला आहे.
उबाठा शिवसेनेसह राजकारणाची सूत्रे हलविणारे उद्धव ठाकरे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि मुंबई विभागीय काँग्रेसचा कारभार पाहणार्या वर्षा गायकवाड या बलाढ्य नेत्यांचे वास्तव्य असलेला मतदार संघ हा उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघ.
हा मतदारसंघ नेहमी चर्चेत असतो. राधाबाई चाळीपासून तीन अतिरेकी यमसदनाला धाडेपर्यंत वांद्रापासून जोगेश्वरीचा हा पट्टा अशांत टापूच म्हणता येईल. जोगेश्वरीची राधाबाई चाळच नाही तर निर्मलनगर, गोळीबार कॉलनी, बेहराम पाडा, कुर्ल्यातील बैलबाजार ही कूकर्म्यांची वसतिस्थानेही म्हणता येईल. त्यातल्या त्यात एक सुखासमाधानाची बाब म्हणजे वांद्रे पश्चिम ते जुहू समुद्रकिनार्यापर्यंत बॉलीवूडच्या बड्या हस्तींसोबत उच्चभ्रूंची आलिशान वस्ती येथे आहे.
अशा या मतदारसंघात कुर्ला, वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, कलिना, चांदिवली, विले पार्ले हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. हिंदू-मुस्लीम समसमान लोकसंख्येचा हा भाग आहे. पाणीकपातीने गांजलेल्या या मतदारसंघात पुनर्विकास, वाहतूककोंडी हे प्रश्नसुद्धा वेळोवेळी डोकं वर काढत असतात. त्यांची सोडवणूक तर होत नाही; परंतु विकासात्मक सोयी-सुविधांची सातत्याने अडवणूक करणे हे येथील जनतेत मिसळलेल्या उपद्रवींचे आवडते काम. म्हणून मतदारसंघ पूर्व बाजूऐवजी पश्चिमेला सुसंस्कृत वाटतो.
तिथल्या रस्त्यांबरोबर रडतखडत का होईना परंतु विकासात्मक व सुंदर रचनेने पुनर्विकासाची कामे होताना दिसतात. तथापि, हा निकष लावायचा झाल्यास वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ व वांद्रे पश्चिम मतदार संघ यातला मराठी टक्का तपासून पाहा. वांद्रे पूर्वेला गव्हर्नमेंट कॉलनीसारख्या मराठी वस्त्या सोडल्या तर सांताक्रूझशिवाय मराठी भाषिकांची वस्ती कमीच. वांद्रे पश्चिम मतदारसंघात तर मराठी औषधाला शोधून सापडणे कठीण. वांद्रे पूर्वेला ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली संजय पोतनीसांच्या शिष्टाईने पुनर्विकासाची कामे मार्गी लागत आहेत.
अर्थात, कोर्टबाजी कमी झाल्या तर पुढील पाच वर्षांत या परिसराचा संपूर्ण चेहरा-मोहरा बदलेल. ‘उबाठा’कडून वरुण सरदेसाई हे विधानसभा निवडणुकीत येथून उमेदवार म्हणून नशीब आजमावत असल्याने मतदारसंघाचा कायापालट होणे शक्य आहे, अशी आशा मतदारांना त्यांच्यामुळे वाटत आहे. परंतु ते कशाप्रकारे मतदारांच्या समोर जात त्यांना आपलेसे करतात. यावर सर्व खेळ अवलंबून आहे. शिंदे-सेनेच्या तृप्ती सावंतांना तिथे मतदारांना अपेक्षित कार्य करता आले नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याचा फायदा सरदेसाईंना होतो की नाही हे निवडणुकांत स्पष्ट होईलच.
वांद्रे पश्चिमेला मात्र आशिष शेलार हे पुनर्विकासासाठी झटत आहेत. परंतु दोन-तीन वर्षांत मतदारसंघाचा कायापालट होईल याची शाश्वती देणे त्यांनाही शक्य नाही. त्यामुळे ते सुशोभीकरणावर जास्त भर देत आहेत. त्यामुळे वांद्रे रेक्लमेशनसारखा रखरखीत भाग संध्याकाळी आकर्षक रोषणाईने उजळून निघतो.
शेलारांच्या मतदारसंघाप्रमाणेच बैल बाजाराचा समावेश असलेला कुर्ला विधानसभा मतदारसंघ हा मागास समजला जातो. कुर्ला स्थानक परिसरात पूर्वेला रिक्षावाल्यांचा प्रश्न तसेच बेस्ट बस चालकांसोबत होणारे तंटे हा पोलीस व बेस्टच्या प्रशासनास डोकेदुखी ठरणारा विषय आहे.
तसेच कुर्ला नेहरूनगर व चेंबूर कॅम्पचा तीन बत्ती हा बैठी घरे व छोट्या छोट्या झोपडपट्ट्यांनी वेढलेला परिसर. इथली दुर्गंधी व स्वच्छता कशी ओळखायची हा प्रश्नच आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार मंगेश कुडाळकरांनी पुनर्विकासासाठी वारंवार बैठका घेतल्याने बराचसं काम मार्गी लागले आहे. परंतु मोनो मेट्रो कामांमुळे त्यांच्या कार्याला म्हणावे तितके यश लाभलेले नाही. त्यामुळे येथे उबाठा शिवसेनेस हातपाय पसरायला बराचसा वाव आहे. शिंदे-सेनेऐवजी हा मतदारसंघ भाजप किंवा अन्य पक्षाकडे आकर्षिला गेला तर या विभागाचा कायापालट वेगाने होईल. त्यामुळे सर्वसामान्य मतदार मतदानाची वाट पाहात आहे.
कलिना मतदारसंघात काँग्रेसचे झिशान सिद्धीकी आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्याने बलवान मानले जात आहेत. त्यातच बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यामुळे सहानुभूतीची लाट झिशान यांच्या समवेत आहे. दाट मुस्लीम वस्ती हे सिद्धीकींचे बलस्थान. तेथे त्यांचे कार्य मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सिद्दिकींशिवाय इथे दुसर्या कोणाचा विचारच होऊ शकत नाही. काँग्रेसचे सचिन सावंत, भाई जगताप, इब्राहिम भाईजान यांनी या मतदारसंघात उमेदवारी मिळवण्याचा खटाटोप शेवटपर्यंत केला.
तथापि, उद्धव ठाकरे या मतदारसंघाच्या उमेदवारीची माळ वरुण सरदेसाई यांच्या गळ्यात घालणार होते. परंतु सिद्दीकींच्या हत्येनंतर त्यांनी विचार बदलला आणि वांद्रे पूर्वचा विकास घडविणार्या संजय पोतनीसांकडे या मतदारसंघाची धुरा सोपवली. अनुभवी पोतनीस मराठी मतांवर कोणता चमत्कार करतात हे निवडणुकातील डावपेचांत दिसेलच.
विलेपार्ल्यात मात्र भाजपला मविआचा उमेदवार टक्कर देऊ शकणार नाही. पारंपरिक भाजपचा मतदार असा हा विधानसभा मतदारसंघ आहे. गोपीनाथ मुंडेंचा शिष्य पराग अळवणी या मतदारसंघात घरोघरी संपर्क ठेवून आहे. कुणाच्या कुटुंबात लग्न असो वा बारसे तसेच कुणी निवर्तले असेल तिथे अळवणी हजेरी लावणारच. पुनर्विकासाचे प्रश्नही अळवणी संयमाने हाताळतात. येथील मराठी टक्का जास्ती असलेल्या मतदारांना ते भावतात.
चांदीवलीत मात्र शिंदे-सेनेच्या दिलीप लांडेंना यावेळी मविआशी जोरदार लढत द्यावी लागणार आहे. नसीम खान हे माजी मंत्री होते. त्यांचा या मतदारसंघात अनेक कुटुंबांशी वैयक्तिक संबंध आहे. चांदीवली परिसरात काँग्रेसचा झेंडा सगळीकडे फडकत आहे. 2019च्या एकसंध शिवसेनेचे उमेदवार असूनही लांडे हे फक्त 409 मतांनी नसीम खान यांच्यावर विजय मिळवू शकले. वंचितने तिथे उमेदवार दिला नसता तर नसीम यांचा विजय नक्की होता. या मतविभाजनामुळे लांडेंना विधानसभा पाहता आली.