राजधान्यांना जोडणाऱ्या मुंबई-नागपूर महामार्गाची दैना

कोपरगाव – महाराष्ट्राच्या दोन राजधान्यांना जोडणारा मुंबई-नागपूर महामार्ग अस्तित्वात आला. तो वाहतुकीसाठीही खुला झाला. परंतु एका वर्षाच्या आतच या महामार्गाची दैना झाली असून, हा महामार्ग आहे की गाव रस्ता, अशी शंका सध्या या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे पडत आहे.

मुंबई-नागपूर महामार्गावर ठिकठिकाणी गुडघाभर खड्‌डे पडल्याने प्रवासी या खड्ड्यांतून वाट शोधत प्रवास करत आहेत. याचाच फायदा घेऊन रात्रीच्यावेळी प्रवशांना लुटण्याच्या घटना नित्याच्या झाल्या आहेत. मागील महिन्यात शहीद सुनील वल्टे यांचे पार्थीव याच रस्त्याने आणण्यात आले. केवळ 10 मिनिटांचा प्रवास. परंतु अक्षरश: चाळण झालेल्या रस्त्यावरून दहेगाव बोलका या गावी शहीद वल्टे यांचे पार्थिव घेऊन जाण्यासाठी जवानांच्या पथकाला तब्बल एक तास लागला. त्यामुळे या रस्त्याच्या स्थितीचा अंदाज येतो.

एखाद्या रुग्णाला रुग्णालयात घेऊन जायचे असेल, तर विचार न केलेला बरा, अशी अवस्था प्रवाशांची झाली आहे. त्यामुळे खेडे गावाचा रस्ता बरा, असे म्हणण्याची वेळ आली आहे. दोन गावे जोडण्यास इतका वेळ लागत असेल, तर मग दोन राजधान्या जोडण्यास किती वेळ लागेल, अशी चर्चा प्रवासी करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी केवळ बघ्याची भूमिका घेऊन प्रवाशांची सर्कस बघण्याचा आनंद घेत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून साधे खड्डे बुजविण्याची तसदी या विभागाने घेतलेली नाही. विविध खात्यांचे प्रशासकीय अधिकारी, विविध जिल्ह्यांतील खासदार, आमदार याच रस्त्याने मुंबई-नागपूरच्या वाऱ्या करतात. अनेक मंत्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला येतात. त्यावेळी एकाचेही लक्ष या खड्ड्यांकडे गेले नाही? किंवा प्रवासात त्यांना खड्डेच जाणवले नाही का? असा प्रश्‍न सामान्य नागरिकांच्या मनात आल्याशिवाय राहत नाही.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)