राज्यासाठी मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन उपयुक्‍त ; उद्धव ठाकरे

औरंगाबाद – मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनने जोडले जावे ही आमची पूर्वीपासूनच इच्छा आहे. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असतानाच या ट्रेनबाबतही आमचा आग्रह होता. राज्याच्या राजधानीला उपराजधानीशी जोडणारी बुलेट ट्रेन राज्यासाठी निश्‍चितच उपयुक्त ठरेल. तिच्या पूर्ततेसाठी राज्य सरकार पूर्ण पाठीशी आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांना यावेळी दिली.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करताना बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, मराठवाड्यातल्या पहिल्या जागतिक दर्जाच्या सिथेंटीक ट्रॅकचे काम औरंगाबाद विभागीय क्रीडा संकुल येथे वेगाने पूर्ण करण्यात येणार आहे. औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्गाला चालना दिली जाईल, जेणे करून मराठवाड्यातील उद्योग व्यवसायास फायदा होईल. औरंगाबाद-शिर्डी हवाई सेवा सुरु होऊ शकते का याचाही विचार करण्यात येत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

मराठवाडा संतांची भूमी आहे. या संतांच्या भूमीमध्ये पैठण या ठिकाणी संतपीठाची स्थापना करण्यात आली आहे. तसेच जुलमी निजामी राजवटीच्या खुणा पुसून काढण्यासाठी औरंगाबाद जिल्हा परिषदेकडील 144 निजामकालीन शाळा आणि वर्ग खोल्या या नव्याने बांधून त्यांचा पुनर्विकास करण्यात येऊन वैभव प्राप्त होतील अशा शाळा निर्माण करण्यात येणार आहेत.
परभणी येथे 200 बेडसचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे.

मराठवाड्यातील विविध ठिकाणी लवकरच जवळपास 200 मेगा वॅट सौर प्रकल्प उभारण्यात येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.रावसाहेब पाटील दानवे म्हणाले, मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प यशस्वी होऊ शकतो. यासाठी फक्त 38 टक्के जागा द्यावी लागेल. त्यामुळे मुंबई-औरंगाबाद हे अंतर केवळ पावणे दोन तासात पार करणे शक्‍य होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

ऑरिक सिटीमध्ये गुंतवणुकीचे प्रयत्न
कोविडसारख्या प्रतिकूल परिस्थितीतही औद्योगिक विकासाला चालना देण्यात आली असून ऑरिक सिटीमध्ये उद्योगासाठी नियोजनबद्ध पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यामुळे उद्योजक या ठिकाणी गुंतणुकीसाठी उत्सुक आहेत. ऑरिक सिटी प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होण्यासाठी राज्य शासन निश्‍चितपणे प्रयत्न करेल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.