मुंबई : मुंबई महापालिकेने 200 व्हेंटिलेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे करोनाचा धोका कायम असल्याचे दिसून येत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे व्हेंटिलेटरची गरज लक्षात घेता मुंबई पालिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यापैकी 100 व्हेंटिलेटर खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू केली, आता ती पूर्ण झाली असून लवकरच स्थायी समितीच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव ठेवण्यात येणार आहे. हे व्हेंटिलेटर कोविड रुग्णालय आणि कोविड केंद्रांना दिले जाणार आहेत.
करोनाच्या पहिल्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर आरोग्य यंत्रणा सुधारण्यावर भर न दिल्याने दुसऱ्या लाटेत आरोग्य यंत्रणेवर ताण दिसून आला. वाढती करोनाबाधितांची संख्या चिंतेचा विषय झाली आहे. यंदाच्या फेब्रुवारीपासून करोना रुग्णांची संख्या पुन्हा झपाट्याने वाढू लागली आहे. मुंबईतील एकूण रुग्णांपैकी 80 टक्क्यांहून अधिक रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. यापैकी बहुसंख्य रुग्णांना घरातच क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. असे असले तरी सौम्य लक्षण असलेल्या रुग्णांची प्रकृती अचानक खालवण्याची शक्यता असते, त्यामुळे भविष्यात अधिक व्हेंटिलेटर लागण्याची गरज ओळखून हे 200 व्हेंटिलेटर खरेदीचा निर्णय घेतला.
सध्या मुंबईत सुमारे 10 टक्के रुग्णांना उपचाराची गरज असल्याने रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. यातील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना खासगी तसेच पालिकेच्या कोविड रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. त्यामुळे आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरची मागणी वाढली आहे. त्यानुसार अधिक व्हेंटिलेटर खरेदी करण्यात येत आहेत.