गळे काढणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा नियम पाळा, म्हणत मुंबईच्या महापौरांची विरोधकांवर टीका

मुंबई – मुंबईत गळे काढणारे म्हणत होते की लस उपलब्धतेवरुन खोटे दावे केले जात आहेत. पण रुग्णालयातील लसीचा साठा शून्य झाला आहे. एक दिवसाचा किंवा दोन दिवसांचा साठा असे दाखवत आहेत. ते खोटे कसे असू शकेल. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात लस वाया जाण्याचे प्रमाणही कमी आहे, हे आकडेवारीवरून स्पष्ट झाले असल्याचे नमूद करताना मुंबईकरांनो हात जोडून विनंती करते की या गळे काढणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा, तुम्ही स्वतःची काळजी घ्या अशा शब्दांत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजप नेत्यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

कार्यालयात बसून टीका करणे सोपे असते. मात्र त्यांनी आमच्यासोबत कोविड वॉर्डमध्ये आयसीयूमध्ये जावून बघायला हवे. राज्य सरकारला बदनाम करायचे आणि उध्दव ठाकरे यांच्या कामावर बोट ठेवण्याचे उद्योग सुरू असून ज्यांचा काडीचाही संबंध नाही, असे लोकही आता बोलू लागले असल्याचा टोला पेडणेकर यांनी लगावला. मुंबईत रुग्णसंख्या वाढत असून करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. लक्षणे नसतानाही खासगी रुग्णालयात अनेक रुग्ण बेड अडवत आहेत. त्यांनी पालिकेच्या कोविड सेंटर्समध्ये यावे.

ज्यांना आयसीयू बेडची नितांत गरज आहे, त्यांना ते बेड मिळाले पाहिजे, विनाकारण लक्षणे नसलेल्यांनी बेड्‌स अडवून ठेवू नये, कोणत्याही रुग्णालयाने बेड अडवून ठेवल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. व्हेंटिलेटर आणि आयसीयूचे बेड गरजेप्रमाणे रुग्णांना मिळायला हवेत. त्यासाठी नियम पाळायला हवेत, असे आवाहनही त्यांनी केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.