मुंबई – मुंबई महापालिकेने सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण आढळलेले मुंबईतील विभाग “हॉटस्पॉट’ म्हणून जाहीर केले आहेत. जी दक्षिण आणि ई हे वॉर्ड अतिगंभीर प्रकारात मोडतात. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सरकारी आणि खासगी ही दोन्ही निवासस्थाने गंभीर स्थिती असलेल्या विभागांमध्ये मोडतात.
जी दक्षिण आणि ई हे वॉर्ड अतिगंभीर स्वरुपाचे “हॉटस्पॉट’ आहेत. या दोन्ही प्रशासकीय विभागात 40 पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. जी दक्षिणमध्ये मुंबईतील सर्वाधिक म्हणजे 68, तर ई वॉर्डमध्ये 44 करोनाग्रस्त सापडले आहेत. 5 एप्रिलपर्यंत सापडलेल्या रुग्णांच्या आकड्यावरुन हे “हॉटस्पॉट’ ठरवण्यात आले आहेत.
ई वॉर्डमध्ये भायखळा, रे रोड, सुखलाजी स्ट्रीट, वाडीबंदर या भागांचा समावेश होतो. काल रुग्णांची वाढ झाल्यामुळे हा भाग पाचव्या क्रमांकावरुन दुसऱ्या क्रमांकावर गेला.
के पूर्व आणि वांद्रे-कलानगर असलेला एच पूर्व या विभागांमध्ये फक्त एका रुग्णाचा फरक आहे. एखादा रुग्ण वाढला, तर कलानगर असलेला विभाग टॉप 5 मध्ये जाईल. या विभागामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे “मातोश्री’ हे खासगी निवासस्थान येते.