शारजा :- मुंबई इंडियन्सने अचूक गोलंदाजी व अफलातून क्षेत्ररक्षणाच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादवर 34 धावांनी सहज विजय मिळवला. विजयासाठी 209 धावांचा पाठलाग करणाऱ्या हैदराबादला 7 बाद 174 धावांवर रोखत मुंबईने सोप्या विजयाची नोंद केली.
That’s that! @mipaltan win by 34 runs and register another win in #Dream11IPL 2020.#MIvSRH pic.twitter.com/CIZEjDmvXa
— IndianPremierLeague (@IPL) October 4, 2020
हैदराबादच्या डावाची सुरुवातच निराशाजनक झाली. जॉनी बेअरस्टो लवकर बाद झाल्यावर कर्णधार डेव्हिड वॉर्नरने डावाची सुत्रे आपल्या हाती घेतली. मात्र, त्याला दुसऱ्या बाजूने एकाही फलंदाजाची साथ लाभली नाही. त्यांचे गडी ठराविक अंतराने बाद होत गेले. वॉर्नरने 44 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 60 धावांची खेळी केली. त्याच्या अर्धशतकाव्यतरिक्त एकाही फलंदाजाला संघाच्या विजयासाठी मोलाची कामगिरी करता आली नाही.
मनीष पांडे याने उपयुक्त खेळी केली मात्र, तो देखील स्थिरावलेला असतानाच बाद झाला. डावाच्या 16 व्या षटकात वॉर्नर बाद झाल्याने त्यांचे आव्हानच संपले. इशान किशन, राहुल चहर व कर्णधार रोहित शर्मा यांनी अफलातून झेल घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ट्रेन्ट बोल्ट, जेम्स पॅटिन्सन, जसप्रीत बुमराह व कॅरन पौलार्ड यांनी अत्यंत अचूक गोलंदाजी करुन हैदराबादच्या फलंदाजांना जखडून ठेवले होते.
तत्पूर्वी, कॉन्टन डीकॉकचे आक्रमक अर्धशतक व अन्य फलंदाजांनी केलेल्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात द्विशतकी धावसंख्या उभारली.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा कर्णधार रोहित शर्माचा निर्णय संघातील सध्या भरात असलेल्या फलंदाजांनी सार्थ ठरवला.
रोहितला गेल्या सामन्याप्रमाणे खेळी करण्यात अपयश आले. तो एक षटकार फटकावून त्याच धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर यंदाच्या स्पर्धेत आजवर झालेल्या सामन्यांत अपयशी ठरलेल्या डीकॉकची बॅट या सामन्यात चांगलीच तळपली. त्याने सर्वदूर फटकेबाजी केली. त्याने प्रथम सूर्यकुमार यादव व नंतर इशान किशन यांच्या साथीत महत्वपूर्ण भागीदारी करत संघाचा डाव सावरला.
यादव स्थिरावलेला असताना 27 धावा काढून बाद झाला. त्यावेळी इशान किशन याने डीकॉकला सुरेख साथ देत संघाचे शतक फलकावर लावले. दरम्यान, डीकॉकने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 39 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी करत 67 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर आलेल्या हार्दिक पंड्यानेही आक्रमक फलंदाजी केली. ही जोडी मोठी धावसंख्या उभारेल असे वाटत असतानाच पंड्या बाद झाला. त्याने 19 चेंडूत 2 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 28 धावा केल्या.
इशान किशनही रंगात आलेला असताना 31 धावांवर बाद झाला. त्याने 23 चेंडूत 1 चौकार व 2 षटकार खेचले. त्यानंतर मात्र, पॉवर हिटर कॅरन पोलार्डने डावाची सुत्रे आपल्या हाती घेत कृणाल पंड्यासह संघाला द्विशतकी मजल मारुन दिली. पोलार्डने 13 चेंडूत 3 षटकारांसह नाबाद 25 तर, पंड्याने केवळ 4 चेंडू खेळताना 2 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 20 धावा केल्या. या जोडीने केलेल्या आक्रमक खेळीमुळे मुंबईला द्विशतकी धावसंख्या उभारण्यात यश आले.
संक्षिप्त धावफलक – मुंबई इंडियन्स – 20 षटकांत 5 बाद 208 धावा. (कॉन्टन डीकॉक 67, इशान किशन 31, हार्दिक पंड्या 28, सूर्यकुमार यादव 27, कॅरन पोलार्ड नाबाद 25, कृणाल पंड्या नाबाद 20, संदीप शर्मा 2-41, सिद्धार्थ कौल 2-64) सनरायझर्स हैदराबाद – 20 षटकांत 7 बाद 174 धावा. (डेव्हिड वॉर्नर 60, मनीष पांडे 30, ट्रेन्ट बोल्ट 2-28, जेम्स पॅटिन्सन 2-29, जसप्रीत बुमराह 2-41).