#IPL2019 : कोलकातासाठी ‘करो या मरो’ तर मुंबई पहिल्या स्थानासाठी उतरणार मैदानात

मुंबई इंडियन्स Vs कोलकाता नाईट रायडर्स

वेळ – रा. 8.00 वा.
स्थळ – वानखेडे स्टेडियम, मुंबई

मुंबई – दोनवेळचा विजेता ठरलेल्या कोलकाता नाइट रायडर्ससाठी यंदाच्या सत्रातील शेवटचा सामना हा “करो या मरो’ असा असून प्ले ऑफमध्ये पात्र ठरण्यासाठी त्यांना मुंबईविरुद्ध रविवारी होणाऱ्या सामन्यात विजय आवश्‍यक आहे. तर 16 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर असलेले मुंबई इंडियन्स पहिल्या स्थानासाठी मैदानात उतरणार आहेत.

कोलकाता आणि हैदराबाद यांनी आतापर्यत प्रत्येकी 13 सामने खेळले असून त्यांनी 6-6 सामन्यात विजय मिळविला आहे. पण सर्वोत्कृष्ट रननेटमुळे हैदराबाद गुणतालिकेत चौथ्या, तर कोलकाता पाचव्या क्रमांकावर आहे. गतविजेत्या हैदराबादला प्ले ऑफमध्ये दाखल होण्यासाठी बंगळुरुविरोधात विजय आवश्‍यक आहे. तर दुसरीकडे कोलकाताला प्ले ऑफमध्ये दाखल होण्यासाठी मुंबईवर विजय मिळवित हैदराबादच्या पराभवाची प्रतीक्षा असणार आहे.

या सत्रात चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांनी प्ले ऑफमधील आपापले स्थान निश्‍चित केले आहे. आता केवळ एका स्थानासाठी कोलकाता आणि हैदराबाद यांच्यात स्पर्धा आहे. साखळी फेरीतील कोलकाताचा हा अखेरचा सामना आहे. मागील सामन्यात संघाने किंग्ज इलेव्हन पंजाबवर सात विकेटने मात करत प्ले ऑफमधील आपल्या आशा कायम ठेवल्या आहेत.

घरच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात पंजाबने 6 बाद 183 धावा केल्या होत्या. हे आव्हान कोलकाताने 2 षटके राखत पार केले होते. या सामन्यात शुभमन गिल याने शानदार 65 धावांची खेळी केली होती. तसेच ख्रिस लिन (46) आणि स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल यांनी निर्णायक खेळी केली होती. मुंबईविरुद्धही त्यांच्याकडून अशाच खेळीची संघाला अपेक्षा आहे. या सत्रात कोलकाताच्या विजयात रसेलने फलंदाजी आणि गोलंदाजीत मोठे योगदान दिले आहे. रसेलने 13 सामन्यात आतापर्यत 510 धावा फटकावित तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दुसरीकडे प्ले ऑफमध्ये निश्‍चित झालेल्या मुंबई इंडियन्स आता गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर झेप घेण्यासाठी मैदानात उतरणार आहे. गतसामन्यात हैदराबादविरुद्ध सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबईने विजय मिळविला होता.
दरम्यान, या सत्रात झालेल्या पहिल्या सामन्यात कोलकाताने मुंबईवर 34 धावांनी मात केली होती. या सामन्यात शुभमन गिल (76) आणि ख्रिस लिन (54) आणि आंद्रे रसेलने 40 चेंडूत नाबाद 80 धावांची विस्फोटक खेळी केली होती. या सामन्यातही संघाला पुन्हा त्याच खेळीची अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.