मुंबई – आयपीएल स्पर्धा होणार असल्याचे संकेत मिळाल्यानंतर लगेचच या स्पर्धेतील सर्वांत जास्त यशस्वी ठरलेल्या मुंबई इंडियन्स संघाने सरावही सुरू केला आहे.
संघाची मालकी असलेल्या रिलायन्स कंपनीने नवी मुंबईतील त्यांच्या घणसोली येथील जागेत एक मैदान तयार केले होते. याच मैदानावर संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्यासह अष्टपैलू हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, यष्टीरक्षक फलंदाज आदित्य तरे, सूर्यकुमार यादव व धवल कुलकर्णी या खेळाडूंनी सरावात फलंदाजी, क्षेत्ररक्षण व झेल घेण्याचा सराव केला. फलंदाजी करतानादेखील प्रत्यक्ष गोलंदाजाच्या गोलंदाजीवर सराव करण्याऐवजी गोलंदाजी मशिनद्वारे फलंदाजीचा सराव करण्यात आला.
या सरावात या खेळाडूंनी सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन केले तसेच करोनाबाबतच्या सर्व सूचनादेखील अंमलात आणल्या. करोनाचा धोका असतानाही पुरेपूर काळजी घेत सराव करणारा मुंबई इंडियन्स हा आयपीएलमधील पहिलाच संघ ठरला आहे. या सरावात खेळाडू तंदुरुस्तीचा व्यायाम, ट्रेनरच्या सूचनांचे पालन करणार आहेत.