मुंबई – परदेशात होत असलेल्या काही लीगसाठी मुंबई इंडियन्सने आपल्या नावात बदल केला आहे. अमिरातीतील लीगसाठी एमआय अमिरात तर दक्षिण आफ्रिकेतील लीगसाठी एमआय केपटाऊन असे राहणार आहे. आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी ठरलेला मुंबई इंडियन्सचा संघ येत्या काळात या दोन देशांतील लीगमध्येही खेळणार आहे. मात्र, त्यासाठी त्यांनी संघाच्या नावात बदल करण्याचे निश्चित केले.
मुंबई इंडियन्स संघाच्या फ्रॅंचायझीने दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती लीगमध्ये संघ विकत घेतले आहेत. मुंबई इंडियन्सच्या मालकांनी अमिरातीच्या आंतरराष्ट्रीय टी-20 लीग आणि दक्षिण आफ्रिका टी-20 लीगमधील त्यांच्या दोन नवीन संघांची नावे जाहीर केली. या संघांची मालकी रिलायन्सचे सर्वेसर्वा उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या समूहाकडे आहे.
या लीगमधील दोन्ही संघ आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाप्रमाणेच जर्सी परिधान करतील. अमिराती आणि दक्षिण आफ्रिकेतील लीगमधील संघांची नावे तेथील शहरांवरून ठेवण्यात आली आहेत. मुंबई इंडियन्सचे तीन संघ विविध टी-20 लीगमध्ये खेळताना दिसतील. या संघांच्या नावात बदल असला तरी त्यांची जर्सी मात्र सारखीच असेल. पण यावेळी संघातील खेळाडूंबाबत मात्र कोणतीच माहिती समोर आलेली नाही.
आयपीएलमधील खेळाडू या लीगमध्ये खेळू शकतील की नाही, याबाबतही अजून कोणती माहिती मिळालेली नाही. त्यामुळे या दोन्ही लीगमध्ये नेमके कोणते खेळाडू संघाचा भाग होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.