मेलबर्न – ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनला आपल्याकडे घेण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाने १७ कोटी ५० लाख एवढी रक्कम मोजली. मुंबईने काही दिवसांपूर्वी संघातील खेळाडू रिटेन करताना वेस्ट इंडिजच्या कायरन पोलार्डला रिलीज केले होते. त्यानंतर पोलार्ड मुंबईसाठी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून पुन्हा एकदा जोडला गेला. त्यामुळे त्याच्यासाठी पर्याय म्हणून संघाने ग्रीनला मोठी किंमत देत आपल्या संघात घेण्यात यश मिळवले. दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात बॉक्सिंग कसोटी सामना खेळवला जात आहे. यावेळी सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना ग्रीनला गंभीर दुखापत झाली आहे.
भारत व श्रीलंका टी-20 सामना पुण्यात रंगणार; 5 जानेवारीच्या सामन्याची उद्यापासून तिकिटविक्री
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सध्या मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे कसोटी सामने सुरु आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवेळी कॅमेरून ग्रीन हा फलंदाजी करत होता. वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खियाने एक वेगाने टाकलेला चेंडू ग्रीनच्या ग्लोव्हजवर आदळला. त्याच्या हाताला लागलेला चेंडू इतका जबर होता की बोटातून रक्त येऊ लागले. ग्रीनला तत्काळ मैदानाबाहेर नेण्यात आले आणि या खेळाडूला स्कॅनसाठी रुग्णालयात पाठवले गेले.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅमेरून ग्रीनला झालेली दुखापत ही गंभीर स्वरूपाची असल्याने त्याची उर्वरित सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. ग्रीनला सामना सुरु असलेल्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरून थेट रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी त्याच्या दुखापत झालेल्या बोटाचे स्कॅन केले जाणार आहे. चेंडू बोटावर आदळल्यानंतर ग्रीनला मोठ्या प्रमाणात वेदना झाल्याचेही आढळून आले. त्यामुळे तो या दुखापतीतून कधी सावरणार हे सांगता येणार नाही.
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीवेळी डावाच्या ८५ व्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्खियाच्या गोलंदाजीवर कॅमेरून ग्रीनला दुखापत झाली. नॉर्खियाने टाकलेल्या या बाउन्सर चेंडूचा वेग १४४.६ किमी प्रतितास एवढा असल्याने ग्रीनच्या दुखापत झालेल्या बोटातून रक्तदेखील आले. ग्रीनने या डावात गोलंदाजी करताना दमदार कामगिरी केली होती. त्याने दक्षिण आफ्रिकेचे २७ धावांत ५ बळी घेतले. ग्रीनच्या दुखापतीच्या बातमीमुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांचीदेखील चिंता वाढली आहे.