#IPL2019 : अल्झारीची स्वारी हैदराबादवर भारी

अल्झारी जोसेफ

षटके 3.4, धावा 12, बळी 06

हैदराबाद – अल्झारी जोसेफ याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या मदतीने मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा 40 धावांनी पराभव केला. मुंबईने दिलेल्या 137 धावांचा पाठलाग करताना हैदराबादचा डाव 17.4 षटकांत 96 धावांवरच गुंडाळला.

मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 136 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा यशस्वी पाठलाग हैदराबादला करता आला नाही. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो यांनी 33 धावांची सलामी दिली. पण त्यानंतर हैदराबादची फलंदाजी ढेपाळली. अल्झारीने भेदक मारा करत फक्त 12 धावांमध्ये सहा विकेटस्‌ घेतल्या. तसेच राहुल चहर याने दोन, तर जसप्रित बुमराह आणि जेसन बेहरनडॉर्फ यांनी प्रत्येकी एक विकेट घेऊन त्याला चांगली साथ दिली.

दरम्यान, प्रथम फलंदाजीस आलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवात निराशाजनक ठरली. मोहम्मद नबीने चौथ्या षटकात रोहित शर्माला बाद करून संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर हैदराबादच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबई इंडियन्सचे फलंदाज ठराविक अंतरावर बाद होत गेले.

पण एका बाजूने कायरॉन पोलार्ड याने डाव सावरला. त्याने अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत 26 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकार मारत नाबाद 46 धावांची खेळी केली. हैदराबादकडून सिद्धार्थ कौल याने 2 विकेट घेतल्या.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.