मुंबई – झी मराठी या वाहिनीवरील ‘बस बाई बस’ हा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय झाला आहे. खासदार सुप्रिया सुळे,भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हजेरी लावल्यानंतर या कार्यक्रमात मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी हजेरी लावली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करणाऱ्या अभिनेता सुबोध भावेसोबत यावेळी किशोरी पेडणेकर यांनी धमाल संवाद केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी पेडणेकर यांनी उद्धव ठाकरेंपासून ते नाना पटोलेंसह भाजप नेत्यांची देखील नाव घेतल्याचे दिसून आले.
झालं असं की या कार्यक्रमाच्या स्टाईलप्रमाणे किशोरी पेडणेकर यांना काही गाणी ऐकवण्यात आली आणि त्यावरून कोणाचा चेहरा डोळ्यासमोर येतो असं विचारण्यात आलं. त्यावर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या उत्तरांमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या. कोण होतीस तू काय झालीस तू हे गाणं ऐकताच भाजप नेत्या चित्र वाघ यांचा चेहरा डोळ्यासमोर आल्याचे यावेळी पेडणेकर यांनी सांगितले. तर ‘जाणे कहा गये ओ दिन..’ या गाण्यानंतर माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा चेहरा आठवला तसेच ‘दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा’ या गाण्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा आठवल्याचे देखील पेडणेकर यांनी सांगितले.
View this post on Instagram
काँग्रेस नेते नाना पटोले यांचा चेहरा ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे’ हे गाणं ऐकल्यानांतर डोळ्यासमोर आल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. दिस जातील दिस येतील हे गाणं ऐकल्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तर ‘क्या हुआ तेरा वादा’ हे गाणं ऐकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा डोळ्यासमोर आल्याचे उत्तर किशोरी पेडणेकर यांनी दिले. किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या मजेशीर उत्तरांमुळे कार्यक्रमात चांगलीच रंगत आली.