मुंबई – पवईच्या साकी विहार रोडवर लार्सन एंड टूब्रो कंपनीच्या समोरील साई ऑटो हुंडाईच्या सर्व्हिस सेंटरला भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या आगीत शोरूममधील कोट्यवधींच्या गाड्या जळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामुळे बाजूच्या महावीर क्लासिक या इमारतीत राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुंबईतील पवई येथील लार्सन अँड टुब्रो कंपनी समोर असलेल्या साई ऑटो हुंडाईच्या सर्व्हिस सेंटरला आग लागली आहे. या आगीमुळे धुरांचे लोळ सभोवतालच्या परिसरात पसरले आहेत. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्नीशमन दलाने अथक प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.
या सर्व्हिस सेंटरच्या बाजूलाच असलेल्या महावीर क्लासिक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये आगीमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आगीच्या ठिकाणावरुन स्फोटाचे मोठे आवाज येत आहेत. या ठिकाणी सुरु असलेल्या मदत आणि बचावकार्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.